जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मराठी माणसाने प्रसंगी लवचिक होऊन झुकलं पाहिजे,पालकांनी मुलांना त्यांच्या क्षमते प्रमाणे द्यावे, त्यांना गरजवंत न बनवता सक्षम बनवण्यासाठी जाणिवपूर्वक त्यांच्याशी काही वेळा कठोर वागा. सैन्यदल म्हणजे सर्वोच्च त्यागासाठी वेड लावणारी व्यवस्था आहे,देशाच्या सीमा सुरक्षित करणाऱ्या सैनिकांच्या गाथांतून देशप्रेमाच्या जाज्वल्ल्य स्फूर्ती मुलांमध्ये रोमरोमीत करत रहा.संघर्ष आणि कष्टा– शिवाय कोणतेही लक्ष्य सहज साध्य नाही,या आणि अशा अनेक प्रेरणादायी अनुभवांचा उलगडा कमांडो राम शिंदे यांनी ओझर येथे केला.
बॉर्डरलेस पॅंथर्स कट्ट्याच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत राम शिंदे यांनी अनुभव कथन केले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उदापुर सारख्या खेड्यातून शिक्षण घेत सैन्यदलातील अधिकारी पदापर्यंत मारलेली भरारी, आणि त्यांच्या जीवनातील हळव्या क्षणांचे प्रसंग ऐकून श्रोतेही मंत्रमुग्ध झाले होते.चार तासांची झोप,त्यातून देश सेवेसाठी सीमांवर डोळ्यात तेल घालून कर्त्यव्याप्रती एकनिष्ठतेने कार्यरत राहणे किती त्यागाचे असते,परंतू जेव्हा हे काम आपण आपल्या मातृभूमीच्या रक्षणा– साठी करत असतो तेव्हा ती नोकरी रहात नाही तर फक्त राष्ट्रप्रेमाची चेतना रहात असते असे त्यांनी सांगितले मुलांना संघर्ष करायला शिकवा,त्यांना आयत्या गोष्टी देऊ नका, प्रसंगी नाही म्हणालया शिका,मला हे मिळाले नाही म्हणून मुलाला काही करुन मी देईन यासाठी तुम्ही झगडायची गरज नाही,तुमचे कृपाक्षत्र आणि आशिर्वाद त्यांना देत रहा पण त्यांना औकातीत राहू द्या तरच मुले सक्षमतेने घडतील असे त्यांनी सांगितले.
राम शिंदे पुढे म्हणाले की.,आजकाल पालक मुलांना सर्व बाबी उपलब्ध करुन देतात,मात्र त्यांना संघर्ष काय असतो याची जाणिव होऊ देत नाहीत,त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत पालक म्हणून आपणच अडसर बनत चाललो आहोत.खरं तर मुलांना डबक्यातला बेडूक बनवू नका समुद्रात पाठवा तरच तो व्हेल बनून बाहेर येईल असेही ते म्हणाले. सर्वोच्च त्यागाचं वेड लावणाऱ्या सैन्यदलाविषयी आपण जाणून घ्यायला हवे. मराठी माणसं सैन्यदलात सर्वोच्च अधिकारी म्हणून खूप कमी आहेत.या ठिकाणी जाण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. टीपीकल मराठी माणूस म्हणून थोडं आपल्या संकुचित कोषातून बाहेर पडून सैन्यदलाच्या करिअरमध्ये जाण्यासाठी, मुलांना प्रेरीत केलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या युद्धनितीच्या अनेक खुबी रशियन सैन्यात शिकवल्या जातात, त्यांच्या प्रेरणेत जगातील अनेक सैन्यदले आकृष्ट आहेत.त्यांच्या प्रमाणे धाडस बाणण्याची वृत्ती आपल्या नव्या पीढीत आपण बाणवली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.दूरदर्शनचे माजी संचालक अशोक डुंबरे,डॉ.अमोल पुंडे,विजय कोल्हे प्रा.दिपीका जंगम यांनी श्री.शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली.यावेळी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र घोलप,सर्पदंश रोग उपचार तज्ञ डॉ.सदानंद राऊत,बॉर्डरलेस गृपच्या संस्थापिका डॉ.सीमा शिंदे,विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे,अहिल्यानगरवरुन डॉ.विनोद चोपडे,डॉ.ज्योती तनपुरे,डॉ.बाळासाहेब जाधव,डॉ.वैशाली जाधव, व बॉर्डरलेस चे अनेक पॅन्थर्स आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी कार्यालयात कमांडो राम शिंदे यांचे आगमनहोताना त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.देशप्रेमाने भारलेल्या गीतांने या हद्य प्रसंगाला जणू स्फुर्तीचे कोंदण यावेळी प्राप्त झाले होते.कमांडो राम शिंदे यांची रांगोळीतून सुंदर अशी छबी धोलवड येथील रांगोळी कलाकार काळे यांनी चित्रीत केली होती.एकूणच देशभक्तीने भारलेली ओतप्रोत उर्जा या कार्यक्रमात सर्वांना प्रेरीत करुन गेली.मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.देवीदास तांबे,नंदू भोर, जालिंदर उकीर्डे,दिपक सुकाळे, पोपट नलावडे,राजेंद्र खेत्री आदींसह बॉर्डरलेस गृपच्या सदस्यांनी या कट्ट्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
:–महाआरतीत सहभाग–:बॉर्डरलेस पॅंथर्सचे राज्याच्या विविध भागातून आलेल्या सदस्यांसाठी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री.च्या महाआरतीत सहभाग देण्यात आला.कमांडो शिंदे यांच्या हस्ते सपत्निक श्री.ची महाआरती करण्यात आली.देवस्थानच्या महाप्रसादाच्या सुरुची भोजनाने कट्ट्याची सांगता झाली.