जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर चार महिन्यातच लेखक संजय नलावडे यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित करून ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक वाचकांसाठी पुन्हा नव्याने उपलब्ध करून दिले आहे. या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला.
जुन्नर म्हटलं की शिवनेरी, निखळ निसर्गसौंदर्य आणि वैविध्यपूर्ण समृद्धता हे वैभव आहेच;परंतु प्रतिभासंपन्नतेची अफाट श्रीमंती शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला लाभली आहे.प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या ,काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे विस्मृतीत गेलेल्या परंतु उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अडतीस व्यक्तीमत्वांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम संजय नलावडे यांनी ‘शिवनेरीची श्रीमंती’ या संग्रहात केले आहे. वै.ह.भ.प. गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, स्वर्गीय शेठबाबा निवृत्तीशेठ शेरकर, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, पत्रकारितेतील अनमोल हिरा सदा डुंबरे, शिवकन्या ते सागर कन्या रूपाली रेपाळे अशा अनेक व्यक्तिरेखांचा जीवनपट त्यांनी उलगडला आहे. या पुस्तकाच्या रूपाने माहितीचा एक अनमोल ठेवाच युवक व भावी पिढीसाठी नलावडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असून सर्वांच्या संग्रही असावे असे हे प्रेरणादायी पुस्तक आहे. ‘शिवजन्मभूमीतील अनेक व्यक्तिरेखांचा इतिहास माहीत होत असल्यामुळे आमच्यासारख्या तरुणांच्या तुमच्याकडून आणखीन अपेक्षा वाढल्या आहेत’ असे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रकाशनप्रसंगी सांगितले.
या प्रसंगी चेअरमन सत्यशील शेरकर, लेखक संजय नलावडे, कुसुम नलावडे, साहित्यिक शिवाजीराव चाळक, सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, लेखक गणपत पाटील नलावडे, समाजसेवक शिवाजीराव निलख, ह.भ.प. गंगारामबुवा डुंबरे, तुषारभाऊ थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, पत्रकार दुष्यंत बनकर, लेखक ज्ञानेश्वर पाचपुते, संजय खेडकर, सरपंच वडगाव कांबळी, सुदामराव घोलप, ह.भ.प. धोंडीभाऊ पानसरे, आशाताई निलख, वैभव नलावडे, सरपंच धोलवड, मंगेश काळे, राजेंद्र अमुप, जनार्दन खामकर, जयवंत डुंबरे, सुभाष नलावडे, विश्वजीत चाळक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन दिपकराव सोनवणे यांनी केले.