जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
ओतूर गावच्या हद्दीत बाबीतमळ्या जवळ मांडवी नदीवरील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचा जलसेतु मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती नदीत होत असून पाटबंधारे विभागाने तातडीने येथील पाणी गळती थांबवावी अशी मागणी परीसरातील नागरिकांकडून होत आहे.जलसेतूमधून पाण्याची होणारी गळती मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जलसेतू पासून मांडवी नदी पात्रा साधारणता पाचशे फुटा पेक्षा जास्त खोल असेल त्यामुळे पाणी पडण्याचा ही मोठा आवाज येथे येत आहे.
जुन्नर तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या पिंपळगाव जोगे धरण कालव्याला ओतूर मधील मांडवी नदीवरील जलसेतू मधील दोन गाळ्यातील जॉइन्ट खराब झाल्यामुळे या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती मांडवी नदीपात्रात होत असून श्रावणी सोमवार कपर्दिकेश्वर यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी जाण्यासाठी व स्थानिक शेतकरी येजा करण्यासाठी या जलसेतू चा वापर करत असतात.
याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या याभागातील अभियंते यु.बी.भोर यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.तसेच या गळती बाबत वरीष्ठ कार्यालयाला माहीती दिली.पिंपळगाव जोगा धरणा- तून गुरूवारी ५० क्युसेक्स तर वाढवून शुक्रवारी १५० क्युसेक्स आणि शनिवारी २०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पिंपळगाव जोगा शाखा अभियंता बाळासाहेब हांडे यांनी दिली.पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याचे ठिक ठिकाणी अस्तरीकरण उखडल्याने व झाडे झुडपेही मोठ्या प्रमाणात कालव्यात वाढलेली असल्याने या कालव्या- तुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पाझर व गळती होत असून हा कालवा फुटण्याची भीती ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असल्याने या कालव्याचे नव्याने पूर्ण अस्तरीकरण किंवा आधुनिक पध्दतीने डागडुजी करण्याची गरज आहे.
याबाबत कालव्या लगतच शेतकरी दरवर्षी मागणी करत आहे.पिंपळगाव जोगे धरणाचा सुमारे ७१ किमी लांबीचा असणारा कालवा जुन्नर तालुक्यातील पिंपळ- गाव जोगा,डिंगोरे,उदापूर,ओतूर,डुंबरवाडी,उंब्रज, गायमुखवाडी,पिंपरी पेंढार,वडगाव आनंद,आळे, आळेफाटा,राजुरी,बेल्हे,पारनेर तालुक्यातील तसेच पारनेर पाडळी,आळे,अळकुटी,लोणी मावळा,वडझरे या गावांमधून जात असून पारनेर तालुक्यातील वडझिरे तलावात शेवटी मिळतो.या कालव्याच्या कामाला सुमारे तेरा ते चौदा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे.प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडण्या आधी कालव्याची पाहणी करून पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असून कालव्यातील झाडे झुडपे काढणे गरजेचे आहे.
जेथे जेथे कॉक्रेट चा भाग उखडला आहे तेथे डांगडूजी करणे गरजेचे असून पाटबंधारे विभाग कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्या आधी डागडुंजी साठी उपाय योजना करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच प्रत्येक वर्षी पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यावर कालव्याच्या गळतीच्या घटना समोर येतात. त्यामुळे या कालव्याचे पुर्ण नव्याने अस्तरीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.याबाबत कुकडी पाटबंधारे विभागा क्र. १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले की पिंपळगाव जोगा कालव्याला ओतूर येथील मांडवी नदीवरील जलसेतू चे दोन गाळ्याना जोडणारे रबरी सील खराब झाल्यामुळे या जलसेतू मधून पाणी गळती होत आहे.ते सील सोमवारी उपलब्ध होणार असून कालव्याच्या पाण्याचा विसर्ग बंद करून ते बदलून जलसेतूची गळती बंद करण्यात येणार आहे.