मळगंगेचा नैसर्गिक पुल :- गुळुंचवाडी (आणे घाट)

अमेरिकेतील गोल्डन नैसर्गिक पुल आपण पाहून किंवा त्याविषयी खूप काही ऐकून असालच. त्याच पठडीतील एक जुन्नर तालुक्यातील आणे घाटातील गुळुंचवाडीच्या मळगंगेच्या नैसर्गिक पुला विषयी कदाचित आपल्या वाचनात किंवा पाहण्यात आले असेलच. अमेरिकेतील गोल्डन नैसर्गिक पुलाच्या वाट्याला अमाप प्रसिद्धी मिळाली परंतु जुन्नर तालुक्यातील या पाच नैसर्गिक पुलांना पर्यटन अज्ञानातून या ठिकाणी कुणी उभे ही राहत नाही हे दुर्भाग्यच. पण या पार्श्वभूमीवर खऱ्या भटक्यांची पावले या घाटात किंवा इतरच्या चार ठिकाणी असलेल्या नैसर्गिक पुलांपाशी उमटली की पाहणारास थक्क व्हायला होते.

गुळुंचवाडी व इतर ठिकाणचे चार नैसर्गिक पुलांचे कोडे सोडविण्यासाठी मग थोडेसे भू-शास्त्रकडे वळावे लागते. आपला भू-भाग प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे. यातील काही स्तर हे कठीण तर काही मऊ, मृद खडकाचे आहेत. या भू-स्तरांवर निसर्गातील ऊन, वारा पाऊस आणि पाणी हे घटक सतत परिणाम करत असतात. हजारो वर्षांच्या या संघर्षात (घर्षणात) मृदू खडका जवळचे भू-स्तर नष्ट होतात, बदलतात किंवा नवे रूप धारण करतात. निसर्गाच्या या बदलांमध्ये कधीकधी त्या भुस्तरांना एक आगळा वेगळा आकार प्राप्त होतो, आणि त्याचे आकर्षण म्हणुन पर्यटनाचा केंद्रबिंदूही बनतात. अमेरिकेतील गोल्डन नैसर्गिक पुल किंवा गुळुंचवाडीचा किंवा इतर चार ठिकाणचे हे नैसर्गिक पूल ही याच बदलातील आकर्षक भू-रचना आहे.

गुळुंचवाडीचा हा नैसर्गिक पुल तब्बल २१ मीटर लांब, ९ मीटर रुंद, तर २ तर ६ मीटर पर्यंत उंच आहे. शेजारीच पश्चिमेस मळगंगेचे मंदिर असल्याने या पुलाची माहिती स्थानीकांच्या माध्यमातून इतरत्र थोड्या प्रमाणात का होईना प्रसारीत होते व हा नैसर्गिक चमत्कार पहाण्याचे भाग्य त्यांच्या पदरी पडते. अगदी सहज सोपे पोहचता येईल असे हे ठिकाण पुर्व पश्चिम वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याने निर्माण झाले आहे. अनेक वर्षे सतत पावसाच्या पाण्याने वाहणा-या पाण्याच्या प्रयत्नातून साकार झालेला हा नैसर्गिक चमत्कार आहे. हा पाण्याचा प्रवास किती लाख वर्षांपूर्वी पासून चालू असेल हा प्रश्न जेव्हा आपण हा नैसर्गिक पुल पाहतो तेंव्हा उपस्थित होतो.

जुन्नर तालुक्यातील हा एकमेव नैसर्गिक पुल छोट्याशा दरीत निर्माण झाला असून इतर चार पुल डोंगरांच्या उंच कड्यावर उभे असलेले पहावयास मिळतात. हे पाहण्यासाठी धाडस व शारीरिक फिटनेस असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रसिद्धी पासून व अभ्यासकांपासुन वंचित आहेत. ते कसे आपण पाहूया.२) हटकेश्वर नैसर्गिक पुल: – आलमे आष्टविनायक लेण्याद्री गणपती मंदिर ज्या डोंगरावर वसलेले आहे तिच डोंगररांग पश्र्चिमेकडे जाते व पुढे उत्तर दक्षिण पसरलेली पहावयास मिळते. स्थानिक या ठिकाणाला “हटकेश्वर” व व-हाडी डोंगर म्हणून संबोधतात. याच डोंगरास सोन्याचा डोंगर असे पण म्हणतात. कल्याण, अहमदनगर महामार्गने प्रवास करताना ही रांग पिंपळगाव जोगा या ठिकाणी आपणास दक्षिणेला पहावयास मिळते व हा नैसर्गिक पुल पाहताच क्षणी आपले लक्ष वेधून घेतो. येथे जाण्याची प्रबळ इच्छा जागृत होते. यासाठी आपण मार्ग शोधू लागतो. येथे जाण्यासाठी दोन मार्ग भेटतात ते आलमे व गोद्रे या गावांतुन. याच डोंगरावर ऐतिहासिक पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. नैसर्गिक पुल पाहताच आलेला थकवा क्षणात नाहीसा होतो व कितीतरी वेळ आपण या ठिकाणाच्या सहवासात रमून जातो. दोन डोंगरांना आसमंतात जोडणारा पूल जणू आपणास आसमंतातच घेऊन जातो की काय असा भास होतो. कारण पश्चिमेस धूके तर पुर्वेस मंत्रमुग्ध करणारा हिरवाईचा शालू पांघरलेला तीन हजार फुट खोल सखल भू-भाग एक वेगळीच उर्जा निर्माण करतो. पावसाळ्यात तर येथील नैसर्गिक सौंदर्य मनाला वेगळीच भूरळ घालतो. ६ मीटर लांब,३मी.रूंद तर जवळपास ६ मीटर उंच असलेला हा पुल विविध प्रकारच्या फुलांचा साज घालून नटलेला पर्यटकांना पहावयास मिळतो.३)खिरेश्वरच नैसर्गिक नेढ. याच ठिकाणाहून उत्तरेची हरिश्चंद्रगड डोंगर रांग पिंपळगाव जोगा धरणाच्या पलिकडून आपणास खुनवताना दिसते व येथील नैसर्गिक सुख प्राप्त होताच आपली पावले पडतात ती हरिश्र्चंद्रगडाच्या दिशेने. मग काय खुबी फाट्यावरच निसर्ग देवता आपणास आलिंगन द्यायलाच पुढे आली की काय असा भास होतो. पिंपळगाव जोगा धरणाच्या पश्र्चिम भिंतीवरून आपला निसर्गमय प्रवास सुरू होतो. विविध पक्षी विविध मधूर आवाजात आपले मनोरंजन करण्यासाठीच सरसावलेले पहावयास मिळतात. भिंत संपण्या आधिच नागेश्वराच पुरातन मंदिर दर्शन घडते व जवळच २२०० वर्ष जूना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लेणी समूह आपला मनाच्या पुस्तकातील पाने पलटायला सूरूवात करतो. एवढ्यात समोरची काळीकुट्ट उभी असलेली कातळ मनात धडकी भरवतात व पलटत असलेली पाने विसरून जातो. कातळ कडे पाहून त्यावर चढण्याचा मोह आणावर होतो. नजर फिरवताना खिरेश्वर गावाच्या पश्र्चिमेकडील डोंगरावर एका ठिकाणी आपली नजर स्थिरावते. हे निसर्ग नवल पाहून आपण भारावून जातो. मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. व त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्या साडेतीन हजार फुट उंच कड्याकडे मग आपण वाटचाल सुरू करतो. हरिश्र्चंद्रगडाकडे टोलार खिंडीकडुन प्रवास न करता आपणास हा प्रवास जुन्नर दरवाजाकडून सुरू करावा लागतो. सोबत लोकल गाईड घेऊन गेलात तर जंगलातील वाटा सहज आणि सोप्या होतात. तसा खिरेश्वराच हे नैसर्गिक नेढं पाहणे म्हणजे पुणर्जन्म प्रात्त केल्या सारखे आहे.कारण विविध मार्गांना तोंड देत येथे पोहचावे लागते. त्यामुळे शक्यतो येथे जाण्याचा मोह टाळलेलाच बरा. जेंव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा या पुलाच्या नवलाईकडे पाहून अक्षरक्ष: भारावून गेलो. दोन्ही बाजूंनी असलेले साडेतीन हजार फुट खोल द-या, पुर्वेस पिंपळगाव जोगा धरणाचे अथांग पसरलेले सागरी रूप तर पुलातून पश्चिमेस डोकावून पाहिले तर सह्याद्रीच्या द-या खो-यांचे विस्तीर्ण पसरलेल जाळ पाहून मनात धकधक सुरू होते. अंदाजे १५ मी. लांब, ५ मी.रुंद तर जवळपास ३ मी. उंची असलेल्या या नैसर्गिक पुलाची निर्मीती जगातील एक आजुबाच आहे की काय असा भास होतो. महाराष्ट्रात आजपर्यंत येथे कुणी पोहोचल्याचे ऐकिवात नाही असे स्थानिक सांगतात. हे नैसर्गिक नेढ पाहणं ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती. अशाच परंतु सोप्या घाटघरच्या पुर्वेस असलेल्या लिंगीच्या नैसर्गिक पुलाचं कुतुहल ऐकिवात होत.४) दात / वेसन नेढ: – घाटघरलांबून हस्तीदंता सारखा दिसणारा नैसर्गिक पुलाची भयानकता प्रत्यक्ष जंगल तुडवत खडी चढाई चढुन गेल्यावर पहावयास मिळते.९मी. लांब, २ मी.रूंद व १.५ मी उंच असलेल्या या काळ्या कातळातील मधील भागाची झिज कशी काय झाली असावी असे कोडे पडते. ५) टोक नेढ: – घाटघरपश्र्चिमेस असलेल्या नाणेघाटचा पहारेकरी किल्ले जीवधन चे व नाणेघाट परीसराचे सुंदर दृष्य या ठिकाहून अधिकच विलोभनीय दिसते. व ते पाहण्यासाठी आपण नाणेघाट कडे वाटचाल सुरू करतो. पुरातन व्यापारी मार्ग नाणेघाट उजव्या हाताला ठेवून आपण किल्ले जीवधनकडे जसं जसे जाऊ लागतो तेंव्हा जीवधनच्या दक्षिणेला उभा असलेला व या परीसराचा खरा आकर्षण असलेला खडापारशी अर्थात वानर लिंगी एक जागतिक आश्चर्यापेक्षा कमी भासत नाही. लाखो गिर्यारोहकांची धडकन आणि पसंती हा वानरलिंगी होय. किती लाखो वर्षांच्या मेहनतीने निसर्ग देवतेने या वानरलिंगीला आकार दिला असेल हे विचारांच्या पलिकडले आहे. याच वानरलिंगीच्या दक्षिणेस ३००० फुट खोल कड्यात या नैसर्गिक पुलाची निर्मीती कशी झाली असावी हा अभ्यासकला विचार करायला लावणारा पुल आहे. या पुलाची विशेषता म्हणजे या ठिकाणी एकुण चार विविध होल पहावयास व विचार करायला लावणारे आहे. एक बाजू सपाटी कडे असून दुसरी बाजू ३००० फूट खोल दरीत निघते. जवळपास २५ मी. लांब, ३ मी.रूंद तर १३ मी. उंची असलेला हा पुल खरोखरच अभ्यासकांना साद घालतो आहे. हा संपूर्ण परिसर खोल द-या खो-यांनी वेढलेला असल्यामुळे येथील सुंदरता येथे पुन्हा पुन्हा येण्यासाठी आकर्षीत करते. खरोखरच एकाच तालुक्यात पाच नैसर्गिक पुल व नेढ पहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच आहे. भौगोलिक दृष्ट्या या पुलांचा अभ्यास होण गरजेच वाटते. फक्त उन,वारा, पाऊस यांच्या परीणामानेच हे बनले असावेत की काही अन्य कारणांमुळे यांचा शोध घेणे गरजेचे आहे. भू – हालचालींचा येथील पर्यावरणावर काही परीणाम झाला होता का? झाला तर कधी? या सर्वांची उत्तरे नक्कीच जुन्नर तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या नवीन ऐतिहासिक महत्त्व सांगू लागतील असे मला वाटते. भविष्यात पर्यटन वाढीसाठी हे पाच नैसर्गिक पुल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असे वाटते.

लेखन:- रमेश खरमाळे ,माजी सैनिक

संकलन::-रविंद्र भोर:-उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button