जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्णतेत झपाट्याने वाढ झालेली पहायला मिळते.नैसर्गिक जलश्रोत लवकरच आटल्यामुळे जुन्नर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.वन्यजीव पाण्याच्या शोधात वाड्या वस्तींलगत असलेल्या पाणवठ्यावर व शेतात येऊ लागले असल्याने वन्यजीवांच्या तृष्णेसाठी वनविभाग जुन्नर मार्फत विविध गावच्या वनहद्दीत ठिक ठिकाणी निर्माण करण्यात आलेली विविध कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टॅंकरव्दारे पाणी सोडले जात असुन वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर केली जात आहे.
जसं जशी उष्णतेत वाढ होत जाईल तसं तसे पक्षी प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्ती जवळ व शेताकडे धाव घेऊन मानवाला आणि शेतीला नुकसान करण्याची शक्यता असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पण वन्यजीव वाचविण्यासाठी आपल्या शेताच्या कडेला या प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी सहकार्य करून आपल्या या राष्ट्रीय संपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन प्रदीप चव्हाण:- वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.घाटघर, आपटाळे,हातवीज,सुकाळवेढे,चावंड,जुन्नर,गोद्रे, आलमे अशा विविध गावांमध्ये असलेल्या पाणवठ्यात टॅंकरव्दारे जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केला जाणार असून पशुपक्षांची पाण्या अभावी वणवण होणार नाही याची वनविभाग जुन्नर मार्फत दक्षता घेतली जाणार आहे.