जुन्नर तालुका प्रतिनिधी: -रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची झपाट्याने वाढत असलेली संख्या सध्या जुन्नर तालुक्यात स्थानिक व वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे.येथील शेतकरी वर्ग तर अक्षरशः भितीच्या सावटाखाली वावरताना दिसतो.रात्री दिसणारा बिबट्या दिवसा केंव्हाही दर्शन देऊ लागलाय.वनविभाग जुन्नर मधील अधिकारी व कर्मचारी या समस्येला तोंड देताना हवालदिल झालेला पहायला मिळतो आहे.दिवसरात्र वनविभाग बिबट जनजागृती करण्यासाठी धडपडताना दिसतोय व स्थानिकांच्या रोषाला तोंड देताना पहायला मिळतोय. जुन्नर तालुक्यातील एका वनरक्षकाच्या कार्यक्षेत्रात कमीत कमी ५ ते ८ गावे येत असल्याने एकाच वेळी दोन तीन घटना घडल्या तर नक्की कोणत्या घटनास्थळी उपस्थित रहावे ही समस्या वनरक्षकांसमोर “आ” वासून उभी राहाते. या कारणां- मुळे जर वनरक्षक त्याठिकाणी उशिरा पोहचला तर कामचुकार म्हणून त्यावर स्थानिकांकडून ठपका ठेवला जातो.अपघात रोखण्यासाठी यावेळीवनविभाग जुन्नर कडून आगळावेगळा उपक्रम हाती घेतला जात आहे.
जुन्नर तालुक्यात थोड्या दिवसांपूर्वी मेंढपाळाच्या दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला होता व त्यात तीला जीव गमवावा लागला होता.स्वतःच्या सुरक्षेसाठी वनविभाग जुन्नर मार्फत अनेक वेळा सुरक्षित उपाय योजनांचे मार्गदर्शन करण्यात येतेय परंतु त्या मार्ग– दर्शक सुचनांना नेहमीच केराची टोपलीच दाखवली जातेय व स्थानिक अपघाताला बळी पडताना पहायला मिळतात.परवा घडलेल्या अपघातात पण हेच पहायला मिळाले.उसाच्या कडेला उघड्यावर झोपलेल्या या कुटुंबाने स्वतः साठी सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची जाळी लावली नव्हती व बिबट्याने संधी साधून त्या चिमुकलीला आपले लक्ष्य केले होते. वनविभाग जुन्नर मार्फत आता या मेंढपाळांनी आपल्या कुटुंबाची सुरक्षेसाठी टेन्ट चा वापर करण्यात यावा हा सल्ला दिला जात आहे.जागो जागी मेंढपाळ वाड्यावर जाऊन वनरक्षकांमार्फत टेन्ट लाऊन दाखल जात आहे.अशी माहिती माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी दिली. टेंट चा वापर केल्यास सर्पदंश,विंचू दंश, व बिबट्या पासून डायरेक्ट हल्ले होणार नाही याबाबत जनजागृती केली जात आहे.अमोल सातपुते:-उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे:-सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर व प्रदीप चव्हाण:-वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर यांच्या मार्गदर्शना खाली वनपरीक्षेत्र जुन्नर मधील सर्व मेंढपाळांना टेन्ट लावणे बाबतची जनजागृतीच्या सुचना वनरक्षकांना देण्यात आल्या आहेत.
जवळपास जुन्नर तालुक्यात दोन दिवसांत ८ गावांतील मेंढपाळ यांना टेन्ट लावणे बाबतचे डेमो प्रत्यक्षात मेंढपाळ वाड्यावर जाऊन दाखविण्यात आले आहेत व मेंढपाळांना सुरक्षित उपाय योजनांचे पालन करण्याची विनंती केली जात आहे असे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.