जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
कल्याण-नगर महामार्गाजवळ घोडेमाळ व कोळवाडी ता:-जुन्नर येथील वऱ्हाडी डोंगरावर म्हणजे च हटकेश्वर किल्ल्याच्या शेजारील तेली डोंगरावर सोमवार ता:-८ रात्री मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता.यामुळे जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरा- वरील वनांध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागून वनसंपदा त्याचसोबत वन्यजीव नष्ट होत आहे.आगीचा व धुराचा त्रास या परिसरातील वन्यजीवांना आणि मानवालाही होत आहे.मात्र हे वणवे नैसर्गिक नसून कृत्रिम म्हणजेच मानव निर्मित असल्याची माहिती जुन्नर व ओतूर वनविभागाने दिली.
जुन्नर वनविभागाने डोंगरावर वणवे लावणाऱ्यांना शोधून कारवाई करावी,अशी मागणी पर्यटन प्रेमी, वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.मात्र वनविभाग सर्वच ठिकाणी पोहचू शकत नाही त्यामुळे ज्या विभागात वणवा लागलेला आहे तेथील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वनसमिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने वणवे आटोक्यात आणता येतील असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.जे लोक स्वार्थीपणा साधण्यासाठी रानात वणवे लावतात त्यांना शोधून काढणे या वन समितीच्या मदतीने शक्य होईल.
वऱ्हाडी डोंगर माथ्यावर तसेच इतर सह्याद्रीच्या डोंगरांवर लागलेल्या आगीत डोंगरावरील जनावरांचा चारा, वाळलेले गवत, झाडे व पशुपक्ष्यांच्या वारसांचा अमूल्य असा ठेवा नष्ट झाला.तसेच मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात परिपक्व झालेला रानमेवा या वणव्यामुळे नष्ट होत आहे. तसेच गावरान फळे,फुले, छोटे सरपटणा प्राणी, पशु, पक्षी व इतर वन्यजीवांनाया वणव्याच्या आगीत आपला जीव गमवावा लागत असून, काही प्राणी या वणव्याच्या आगीत जखमी होतात. एकूणच डोंगरावर एकदा लागलेल्या वणव्यात कधी ही भरून न निघणारी अशी निसर्गाची मोठी हानी होत आहे.
एकीकडे शासन वृक्ष लागवडीकडे मोठ्या प्रमाणात सक्रिय भर देत आहे.तर दरवर्षी लागणाऱ्या वणव्याने वृक्षांची कत्तल होत असताना, वन्यजीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे.त्यामुळे वन्यप्राणी गावात वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे.याशिवाय वनसंपदा नष्ट होत असल्याने वातावर- णातील समतोल बिघडून तापमानात वाढ होत असल्याचे जाणवत आहे. या वणव्यामुळे पाणीटंचाईची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे तरी वणवा विरोधी मोहीम वनविभागाने गतिमान करणे गरजेचे आहे, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
:– वनविभागाने अलर्ट मोडवर राहण्याची गरज—:अलीकडे मानव डोंगरात जंगलात जाऊन वेगवेगळ्या कारणास्तव आनंदाने अथवा दुःखाने पार्ट्यां करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी डोंगरावर,तळी नदीच्या काठावर,रानात,जंगलात दगडाची चूल पेटवून जेवण बनवले जाते. त्यामुळे ही जंगलाला आग लागून शकते तसेच काही नागरिक आपल्या फायद्यासाठी लाकूड फाटा मिळावा, शिकार करतात यावी म्हणून जंगलाला आग लावतात. त्यामुळे वनविभागाने अलर्ट मोडवर राहणे गरजेचे आहे. दरवर्षीच सतत होणाऱ्या वणव्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे वनविभागाने वणवा लावणाऱ्यांवर धडक कारवाई करावी अशी मागणी पर्यटक, वन्यजीव प्राणी मित्र संघटना व वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.