जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे यांच्या संशोधनातून सिद्ध झालेला तसेच श्री संत गोरोबा काकांच्या अलौकिक जीवन आणि वाङमयीन कार्याचा समीक्षात्मक आढावा घेणारा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे ‘संत गोरा कुंभार’ होय. ‘या संशोधनाच्या निमित्ताने मोठा सामाजिक, सांस्कृतिक, वाड़मयीन दस्तावेज उपलब्ध झाला आहे’ असे प्रतिपादन संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक व उपासक डाॅ. नारायण महाराज जाधव यांनी केले. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संत ज्ञानेश्वर माउलीं समाधीस्थळी आळंदी येथे नुकतेच संत साहित्याचे साक्षेपी समीक्षक आणि उपासक डॉ. नारायण महाराज जाधव आणि निष्ठावंत वारकरी ह. भ. प. भीमदादा वारकरी यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना, ‘आम्ही जरी न्यायालयात न्याय देण्याचं काम करत असलो तरी ‘संत गोरा कुंभार’ या संशोधनात्मक पुस्तकातून प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे यांनी संत गोरोबा काका यांना खऱ्या अर्थाने योग्य न्याय दिला आहे’ असे उद्गार लातूर विभागाचे धर्मदाय सह आयुक्त बी.डी.कुलकर्णी यांनी मांडले. संत गोरा कुंभार यांचे जन्मगाव ‘तेर’ येथे सातत्याने जाऊन डॉ. डुंबरे यांनी यासंदर्भात संशोधन केले तेव्हा त्यांना आम्ही या शोधयात्रेत अनेकदा मदत केल्याचे पुणे विभागाचे धर्मदाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सांगितले.प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे हे छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयात मराठी भाषा विभाग आणि भाषा संशोधन केंद्राचे प्रमुख असून संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. डॉ. डुंबरे यांच्या अनेक संत साहित्याकृती आणि आठ्ठ्याऐंशी शोधनिबंध प्रकाशित आहेत. या ग्रंथावर जिल्हा न्यायाधिश तथा महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे यांनी भाष्य करताना ग्रंथाची समीक्षा आणि महत्व अधोरेखीत केले. यशदाचे संचालक ह.भ. प. रंगनाथ महाराज नाईकडे, के.एस आतकरेबापू, बजरंग महाराज कर्जुलेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कैलास पब्लिकेशन्स, छ्त्रपती संभाजीनगर यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले असून पनवेल येथील सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश पाटील यांनी सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ साकारले आहे. या समारंभाचे प्रास्ताविक ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर महाराज थोरात यांनी केले तर सुंदर असे निवेदन स्तंभलेखक संजय नलावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वेदांत सत्संग समिती, आळंदी यांचे विशेष सहकार्य लाभले.