(महिलांची कलवड बांधणीची तयारी पूर्ण )
जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील पश्चिम दिशेने सुरुवात केल्यास दुर्गाबाई किल्ल्यापासून दाऱ्या घाटा पर्यंत तेथून नाणेघाटाच्या शिखरापासून ते माळशेज घाट वहरीचंद्रगडा पर्यंत असणंरा सर्व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ग्रामीण आदिवासी लोकांच्या मोठ्या प्रमाणात वस्त्या अनेक वर्षांपासून स्थयिक स्वरूपात विखुरलेल्या असून त्यांना मांडवी,पुष्पांवती, कुकडी,मीना आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात समृद्ध झालेल्या दिसून येतात मात्र जग एकविसाव्या शतकात पोहचताना आधुनिक तंत्रज्ञान स्पर्श झाला असला तरी या आदिवासी लोकांच्या रूढी परंपरा कायम आहेत .
उन्हाळ्याचे दिवसात शेवटी पावसाची चाहुल लागताच या आदिवासी ग्रामीण भागातील मुथाळणे ,मांडवे,कोपरे,जांबुळशी,पुताचीवाडी,माळीवाडी,जोशीवाडी,खिरेश्वर,तळेरान,सीतेवाडी,करांजळे,कोल्हेवाडी, सांगणोरे, खटकाळे,निमगिरी,चावंड,राजूर,उच्छिल,शिवली,इंगळुन,घाटघर,देवळा,या आदिवासी गावातील महिलांची वेगळीच धावपळ असते कारण पावसा– ळ्यात या भागात पावसाचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याने चार महिने घराच्या बाहेर पडणे शक्य होत नसल्याने घरातील चूल चालविण्यासाठी या भागात गॅसला पर्याय म्हणून शेणाच्या गोवऱ्या तयार केल्या जातात.सध्याचा उन्हाळा अतिशय कडक असल्याने या गोवऱ्या लगेच वाळतात त्यामुळे या भागात सध्या शेणाच्या गोवऱ्या थापून अगदी भाकरीच्या आकारात रचून कलवड तयार करण्याची लगबग सुरू आहे. याचकाळात पुरुषांच्या वेगळ्याच कारणाने धावपळ पाहण्यास मिळते.ही सर्व पुरुष मंडळी आपले पशुधन वाचविण्यासाठी साठी पावसाळ्यात सुका चारा,वैरण, भाताचा पेंढा,वाळलेले गवत गोळा करून झाडांच्या खोडात किंवा गंजी रचुन साठवण करताना दिसून येतात.
आजकाल या ग्रामीण आदिवासी भागातीलचुलीचा धूर कमी करण्यासाठी आणि वनसंरक्षन होण्यासाठी उज्वला गॅस योजना अनुदान स्वरूपात विविध उपक्रमांनी सरकार राबविताना दिसून येतात .मात्र सध्याच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी गोवऱ्या व वाळलेल्या झाडांचे सरपण (लाकुडफाट्या) उत्तम पर्याय आहे, वर्षानुवर्ष वापर केला जात आहे. पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणारे हे उत्तम इंधन पावसाच्या पाण्याने भिजू नये व चांगल्या वाळलेल्या गोवऱ्या चोरीला जावु नये यासाठी गोवऱ्यांची कलवड स्वरूपात सुरक्षित रित्या साठवून ठेवल्या जातात तर सरपणासाठी वाळलेली लाकडांच्या मोळ्या बांधून एकावरएक रचून ठेवण्याची स्पर्धाच या भागात अनुभवण्यास मिळते,त्याचबरोबर गुरांचा चारा गंजी रचलेल्या जागोजागी पाहण्यास मिळतात.