जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
एप्रिल सुरू झाला म्हणजे मराठी चैत्र महिना सुरू झाला मात्र यामुळे मानव व निसर्ग या दोघांना मोठा आनंद निर्माण झाला आहे असे वाटते कारण गावोगावी यात्रा,जत्रा,उरूस यांची चैत्र महिन्यात लगबग सुरू होते त्यामुळे मानवाला आनंद साजरा करण्यात उत्साह वाढतो तसेच याच महिन्यात निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या सर्व वृक्षांना चैत्र पालवी म्हणजेच नवीन पालवी फुटते तर काहिंना नवीन फुलांचा बहार आल्याने निसर्ग सौंदर्याने फुलून जातो.त्याच निसर्गाच्या सानिध्यात आणि माळशेज घाट खोऱ्यात असणाऱ्या सहयाद्रीच्या डोंगरावरील जंगलात बहावा सध्या आनंदाने फुलून गेल्याने निसर्गाने सोन्याची उधळण केली आहे असा भास होतो आहे.
माळशेज खोऱ्यातील जंगलात अनेक प्रकारची झाडे,वेली,औषधी वनस्पती उपलब्ध आहेत सध्या संपूर्ण जंगल नव्या पालविने बहरले आहे जणूकाही अनेक महिलांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून सजलेल्या आहेत बहावा वृक्ष मार्च महिन्यात पहिला तर घनदाट पालवी नसलेला मात्र पोपटी वर्ण असलेला पूर्ण झाड निष्पर्ण असते.मार्च महिन्यात या अवस्थेत पाहताना उदास वाटते.
चैत्र म्हणजे एप्रिलमध्ये असाकाही चमत्कार होतो की सोनेरी पिवळ्या रंगाचे त्याचे हे झुंबर या बहावा झाडाच्या अंगाखांद्यावर फेर धरून नाचायला लागतात.सूर्य उगवताना या वृक्षांना पाहिले की हा तेजाने तळपणारा”गोल्डन ट्री”भासतो.निसर्ग आपल्या कुंचल्यातून आणखी एक कलाकृती साकार करतो मग काय जाता येता या सोनेरी बहाव्यावरील नजर हटत नाही.एव्हाना सर्व सामान्य दिसणारे हे झाड असामान्य व राजस होऊन जाते. सध्या माळशेज घाट,हरीचंद्रगड परिसर, खिरेश्वर,करांजळे,तळेरान,सीतेवाडी,मढ,पांगरी,सांगणोरे,वाटखळ,हटकेश्वर,आलमे,गवारवाडी,पिंपळगाव-जोगा,मराडवाडी,भलेवाडी, गिधाडया डोंगर, साबरवाडी, मांडवे,मुथाळणे,कोपरे,जांभुळशी,बर्डीनाथ डोंगरावर असणारे बहावा या वृक्षांना व इतर अनेक ठिकाणी तुरळक असणारे हे वृक्ष पिवळ्या धमक रंगानी बहरून गेली आहेत.
बहावा फुलला की साधारणतः ६०दिवसांनी पाऊस आगमन करतोच म्हणून या वृक्षाला “नेचर ऑफ इंडिकेटर” असेही म्हणतात. मात्र यावर्षी बहावा जरा लवकरच म्हणजे मार्च एन्ड लाच फुलला आहे त्यामुळे २८ मे नंतर पाऊस पडेल असा अंदाज आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत.पावसाच्या बाबत या बहावा वृक्षांचा अंदाज अचूक असतो त्यामुळे या वृक्षाला “”शॉवर ऑफ फॉरेस्ट” असेही संबोधले जाते.