जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती संकुल येथे स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांच्यावतीने शुक्रवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन ओतूर पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर शिवजन्मभूमीतील प्रतिभासंपन्न कर्तृत्ववान महिलांमध्ये कृषी उद्योजक काव्या ढोबळे,जलतरणपटू रुपाली रेपाळे,सीए परीक्षेत यश संपादन केलेल्या ऋतुजा घोलप यांचा शिवभूमीची शिवकन्या पुरस्कार,चंदा मालकर, सीताबाई वारे,वत्सला ढोमसे,मंदा तांबे,सुरेखा गिते यांना आदर्श माता पुरस्कार देताना शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याप्रमाणे गावातील ग्रामपंचायत महिला सफाई कामगारांचा सन्मान महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे हे उपस्थित होते.त्यांनी भारतीय लष्कर सेवेतआलेल्या खडतर प्रसंगांचे अंगावर काटा उभे राहणारे प्रसंग, अनुभव कथन केले.मनोरंजन कार्यक्रमात झी सारेगमप फेम मृदुला मोघे यांनी एकपात्री बहुरंगी हास्यविनोद व सुरेल गाण्यांच्या कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.त्यानंतर महिलांना लकी ड्रॉ सोडतीतून विविध बक्षिसे वितरण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठानच्या मेघना देशमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांनी सुरेख आयोजन केले होते.सूत्रसंचालन संजय गवांदे यांनी केले तर आभार यांनी शोभा तांबे यांनी मानले.