(पाणी ही देवाने दिलेली देणगी आहे, या अमृताची काळजी आपणच घेतली पाहिजे ! – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज )
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आंबेगाव तालुक्यातील चिंचोली (कोकणे) आणि घोडेगाव सह कळंब येथील घोडनदी घाट निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ. निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज’आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सानिध्यामध्ये ‘अमृत प्रकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे यमुना नदीच्या छठ घाटावर उद्घाटन करण्यात आले.
निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन हा प्रकल्प भारतातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५३३ हून अधिक ठिकाणी ११ लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला. सद्गुरु माताजींनी अमृत प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वचनात सांगितले की,पाण्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि ते अमृतासमान आहे.पाणी हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे.
देवाने दिलेल्या या स्वच्छ आणि सुंदर सृष्टीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाला आपल्या कृतीतून प्रेरित केले पाहिजे, केवळ शब्दांनी नाही. जेव्हा आपण प्रत्येक कणात असलेल्या भगवंताशी नाते जोडतो आणि त्याचा आधार घेतो, तेव्हा त्याच्या सृष्टीच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करू लागतो. आपला प्रयत्न असा असावा की जेव्हा आपण हे जग सोडू तेव्हा या पृथ्वीला अधिक सुंदर रूपात सोडून जाऊ. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी .ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकडी, मीना, कऱ्हा, आनंदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा ४३ ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट, कात्रज तलाव, आळंदी-देहू येथील इंद्रायणी नदी घाट, मोरया गोसावी येथील पवनानदी घाट, झुलेलाल घाट, खडकवासला धरण परिसर, नाझरे धरण, पाषाण तलाव इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत.
त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच ठिकठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी ८००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित पाहुण्यांनी मिशनचे भरभरून कौतुक केले आणि निरंकारी सद्गुरू माताजींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि शुभारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना चिंचोली (कोकणे) गावच्या सरपंच *मा.सौ.विद्याताई कोकणे* म्हणाल्या की, ‘जलसंधारण आणि जल स्वच्छता या कल्याणकारी प्रकल्पाद्वारे मिशनने निसर्ग संवर्धनासाठी नक्कीच योगदान देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे’ त्याच बरोबर ‘ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे’ असे उपस्थित घोडेगाव नगरीच्या सरपंच अश्विनीताई तिटकारे यांनी प्रसंगी सांगितले.