(शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाची अविस्मरणीय भेट)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुस्तक वाचनात आयुष्य बदलण्याची ताकद असते.वाचन करणारी माणसं मनाने,विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.वाचन करणारा माणूस शांत व नम्र होतो.काही पुस्तकं वाचनीय असतात, तर काही फक्त चाळायची असतात,काही वारंवार वाचावी अशी असतात तर काही पुस्तकं कायमस्वरूपी संग्रही ठेवावी अशी असतात.अलिकडे वाचनात आलेले आणि कायमस्वरूपी संग्रही ठेवावे इतकेच नाही तर आपल्या मित्रांच्याही घरी संग्रही असावे अशी असतात.यामुळेच ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक १९७८ दहावी बॅचच्या एका माजी विद्यार्थ्याने आपल्या पन्नास वर्गमित्र – मैत्रिणींना ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथील १९७८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी लेण्याद्री येथील हाॅटेल गिरीजामध्ये संपन्न झाला.शेहेचाळीस वर्षांनी एकत्र भेटणाऱ्या या बॅचचे टाटा मोटर्समधून सेवानिवृत्त झालेले माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर बटवाल यांनी या बॅचच्या सर्व पन्नास माजी विद्यार्थ्यांना लेखक संजय नलावडे यांच्या उपस्थितीत ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.आपल्या आयुष्यात मित्र आणि पुस्तक दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.म्हणून याप्रसंगी प्रत्येक मित्राला जुन्नर तालुक्याचा महत्वपूर्ण दस्ताऐवज असलेले ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तक भेट देण्याची कल्पना सुचली असे ज्ञानेश्वर बटवाल यांनी सांगितले. खरंतर या चांगल्या संकल्पनेसाठी ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असूनही महत्प्रयासाने पुस्तकांची जमवाजमव करून लेखक संजय नलावडे, ॲड.राजेंद्र बुट्टे पाटील.कुसुम नलावडे आवर्जून उपस्थित होते. डॉ.रफिक मोकाशी,डॉ.प्रदीप गवळी,महेंद्र गांधी,राजेंद्र टण्णू,ज्ञानेश्वर बटवाल आदी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.दुपारच्या सत्रात या सर्व विद्यार्थ्यांनी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाला भेट देऊन वर्गात प्रार्थना केली आणि गुरुवर्य रा. प. सबनीससर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संध्याकाळी अतिशय जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.