जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र मंडळ टांझानियाच्या बॅनरखाली हिंदुहृदयसम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती दार-ए-सलाम येथील सनातन धर्म सभेच्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात,उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली.महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच बाळ शिवाजी आपल्या दोन मावळ्यांसह घोड्यावर स्वार होऊन या रॅलीच्या वैभवात भर घालत होते.या रॅलीत महाराष्ट्र मंडळाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लेझीम नृत्य केले तर पुरुषांनी जय शिवाजी,जय भवानीचा जयघोष करत संपूर्ण वातावरण उत्साहात दणाणून टाकले.ही मिरवणूक दोन तास चालली, मंदिराच्या मुख्य दरवाजातून मार्गक्रमण करून,सीटी सेंटरला प्रदक्षिणा घालत,मंदिराच्या मुख्य दरवाजा– पाशी येऊन संपली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चार्ज द अफेयर्स वर्तमान भारतीय उच्चायुक्त मनोज वर्मा आणि त्यांच्या पत्नी पूनम वर्मा होते,त्यांच्यासमवेत स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका डॉ.सौम्या चौहान हे देखील उपस्थित होत्या.महाराष्ट्र मंडळ, टांझानियाचे संस्थापक आणि संरक्षक कमलाकर भटभट यांनीही या महोत्सवात आपली उपस्थिती दर्शवली.मंडळाच्या रुचिता अहिरराव आणि वर्षा शिरसागर यांनी एकत्रित पणे सभागृहाच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर आणि मनमोहक रांगोळी काढली.
सर्वप्रथम सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली व उपस्थित सर्व पाहुण्यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचीसुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र मंडळाच्या महिलांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार पाळणा गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा केला.मुख्य अतिथि मनोज वर्माजी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि ते म्हणाले की, शिवाजी महाराजांसारखे शौर्य, रणनीती आणि कार्यक्षम नेतृत्वच देशाचे भले करु शकते, त्यासाठी आपण आपल्या मुलांना त्यांच्या बद्दल सांगून त्यांना सारखी स्वराज्यासाठी लढायला मदत केली पाहिजे. त्यांनी केलेले स्वराज्याचे काम समजावून सांगणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. कार्यक्रमादरम्यान श्री कमलाकर भटभट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याच शृंखलेत अशोक लेलँड टांझानिया कंपनीचे कंट्री मॅनेजर नितीन वाघमारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या– समोर ठेऊन त्यांनी तयार केलेली धोरणे शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि युद्ध धोरण शिकवले जाऊ शकते. स्वप्नील अहिरराव यांनी शूरवीरांची गाथा लयबद्ध रीतीने मांडणारे मराठी भाषेतील गीत पोवाडा सादर करून सर्व रसिकांची मने जिंकली आणि संपूर्ण सभागृहात जय शिवाजी जय भवानी चा जयघोष सुरू झाला.
अफ्रीका खंडातील टांझानियाच्या स्थानिक मुलांचे मराठी भाषेतील ‘शूर आम्ही सरदार’ हे गीत या महोत्सवात खूप गाजले. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला.शिवाजी महाराजांवरील प्रेम पाहून सभागृहातील सर्व श्रोत्यांनी उभे राहून त्यांचा सत्कार केला.यानंतर, इंडियन स्कूल ऑफ दार-ए-सलामच्या मुलांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण करून मंचावर स्वागत केले. शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर करून हिंदू स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी आपणही कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले. अतिशय सुंदर सादरीकरण होते.”हिंदी हैं हम” अंतराष्ट्रिय साहित्य मंच चे दोन गायक नीना मिश्रा आणि महेश शर्मा यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात एक गीतं सादर केले, जे ऐकून प्रेक्षक वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात करत त्यांचा जयजयकार करत होते.
दार-एस-सलाम येथील विविध संस्थांनीही या महोत्सवात उत्साहाने भाग घेतला होता आणि त्यांच्या गीतांनी आणि नृत्याने संपूर्ण उत्सवाचा महत्त्वाचा भाग अशी नोंद करुन दिली.सरतेशेवटी महाराष्ट्र मंडळाच्या गायक-गायिकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह आणि श्रोते टाळ्या वाजवून शिवाजी महाराजांचा जय जयकार करत होते.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन लेखक व संपादक सूर्यकांत सुतार ‘सूर्या व गौरांगी भंडारे यांनी केले.प्रभावी संचालनमुळे, पाहुणे आणि सर्व प्रेक्षक शेवटच्या सादरीकरणापर्यंत रंगमंचाशी जोडले गेले होते.या महामहोत्सवात सुमारे चारशे नागरिकांनी आपली उपस्थिती नोंदवून सहभाग घेतला.कार्यक्रमानंतर महाराष्ट्र मंडळ टांझानियाच्या वतीने सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था पण होती.या आफ्रिका खंडातील टांझानिया मध्ये साजरी झाल्याने बोर्डरलेस पँथर्स ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीने ऑस्ट्रेलियात नोकरी करत असलेले पिंपळगाव जोगा ता:-जुन्नर येथील दिपक सुकाळे यांनी सर्वांचे आभार मानले.