(“कळी उमलताना”*पुस्तिकेच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मुलांनो तुम्ही कुटुंबाचा आधार,देशाचे भाग्यविधाते आणि आई वडिलांचे स्वप्न आहात. त्यामुळे किशोर वयात स्वतःला सांभाळा.जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. दुःखाला सामोरे जाताना विचलित होऊ नका.जीवन अनमोल आहे. आई वडील हेच खरे मित्र आहेत त्यांना जपा.स्वतःचे आरोग्य सांभाळा.मुलांना मार्गदर्शन करताना शिरोली येथे सत्यशील शेरकर बोलत होते.
शिरोली ( ता. जुन्नर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये डिसेंट फौंडेशनच्या वतीने किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियानाअंतर्गत “कळी उमलताना” या उपक्रमा अंतर्गत मुलींना मार्गदर्शन करताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर बोलत होते.
या प्रसंगी “कळी उमलताना” या मार्गदर्शक पुस्तिकेच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मानसिक आरोग्याबाबत संस्थेचे सेक्रेटरी फकीर आतार यांनी तर शारीरिक आरोग्याबाबत विशेषतः मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार,पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड चा वापर,लैंगिक समस्या,एड्स व कॅन्सर याबाबत डॉ. संपदा तोडकर, डॉ. पूजा गायकवाड व डॉ. केतकी काचळे यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सेक्रेटरी फकीरा आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, उपसरपंच वैशाली थोरवे, मुख्याध्यापक पी. एस. हांडे, पर्यवेक्षक अनघा घोडके, आदी मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिसेंट फाउंडेशन मार्फत तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या “कळी उमलताना” या उपक्रमासाठी चेअरमन सत्यशील शेरकर यांनी “कळी उमलताना” या मार्गदर्शक पुस्तिकेच्या दोन हजार प्रति उपलब्ध करून दिल्या. तसेच निवृत्त मुख्याध्यापक सुरेश थोरवे, उद्योजक विलास बोराडे आणि प्रगतिशील शेतकरी प्रवीण शेळके यांस कडून सॅनेटरी नॅपकिन साठी संस्थेला आर्थिक योगदान मिळाले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल मधील ३०० विद्यार्थिनींना मोफत “कळी उमलताना” ही मार्गदर्शक पुस्तिका व सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पी.डी. पादिर यांनी केले तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले तर आभार एस. व्ही. देवकुळे यांनी मानले.
::मासिक पाळी ही नैसर्गिक देणगी आहे. तिला अपवित्र मानू नका. निसर्गाने स्त्रीला निर्मितीचे वरदान दिलेले आहे. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, आहार, व्यायाम व विश्रांती याकडे लक्ष द्या. म्हणजे भविष्यात आपले आरोग्य चांगले राहील.
डॉ. वर्षा गुंजाळ तालुका आरोग्य अधिकारी, जुन्नर