जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
” नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व या क्षमतांचा विकास वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांतून होतो.तसेच मीडियाचा वापर समाज उभारणीसाठी करावा,अशा स्पर्धांमुळे जीवनाला आकार देता येतो असे प्रतिपादन दै.समर्थ गावकरीचे संपादक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांनी केले.ते ॲड.एम.एन.देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,राजुर येथील कै.होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आणि कै.माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
आपल्या पुढील भाषणात डॉ. आरोटे म्हणाले की,”सोशल मीडिया हा असा प्रकार आहे की,तो एखाद्याला उंचावर देखील नेऊ शकतो,तसेच तो त्याला उध्वस्तही करू शकतो. म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे “असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मा.मिलिंद उमराणी हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की,वक्तृत्व या कलेत संकलन,सादरीकरण,देहबोली,शब्दफेक,विषय मांडणी महत्त्वाची असते वितंडवाद करू नये ” यावेळी व्यासपीठावर कै.होनाजी तुकाराम कोंडार वादविवाद स्पर्धेच्या देणगीदार श्रीमती मंगलताई कोंडार उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथीचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी केले.तर अतिथींचा परिचय प्रा.डॉ.भरत शेणकर यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पंढरीनाथ करंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी वादविवाद स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ. लक्ष्मण घायवट व प्रा. बबन पवार, तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले स्पर्धक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.