जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील धरण क्षेत्रातील व टंचाईग्रस्त गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निसर्गपूरक उपाययोजना व रोजगार हमी योजनेचा प्रभावी वापर या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन द नेचर कॉन्झर्वन्सी संस्थेच्या वतीने दिनांक ५ फेब्रुवारी२०२४ रोजी पंचायत समिती जुन्नर येथे करण्यात आले होते.तालुक्यातील ४७ गावां च्या ग्रामसेवक व सरपंचानी या कार्यशाळेत सहभाग घेतला. या प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी हेमंत गरीबे व द नेचर कॉन्झर्वन्सी संस्थेचा संपूर्ण चमू हजर होते.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी निसर्गपूरक उपाययोजना महत्वाची भूमिका पार पाडत असून, ग्रामपंचायत पातळीवर अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज गटविकास विकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी व्यक्त केली.संस्थेच्या प्रकल्प संचालक गिरिजा गोडबोले यांनी संस्थेविषयी तसेच संस्थेच्या जगभरात सुरु असणाऱ्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी,जुन्नर तालुक्यात अंमलात आणता येऊ शकणाऱ्या विविध उपाय योजनांची माहिती देताना संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी सीताराम शरणांगत यांनी सांगितले, कि तांत्रिक क्षमता व माहितीचा अभाव, तसेच रोजगार हमी योजनेबाबत सर्व पातळ्यांवर असणारी अनास्था यामुळे गावात करता येऊ शकणाऱ्या रोजगार हमीच्या एकूण २६६ कामापैकी फार थोडी कामे हाती घेतली जातात.त्यामध्ये बऱ्याचदा नियोजनाचा अभाव असतो.जॉब कार्ड मिळवण्यात,कामाची मागणी करण्यात तसेच आराखडे बनविताना येणाऱ्या अनेक अडचणींविषयी उपस्थित ग्रामसेवक व सरपंचानी मते मांडली. संस्थेच्या गार्गी जोशी यांनी निसर्ग पूरक उपाय योजनांची माहिती दिली.
या कामाला जुन्नर तालुक्यात गती देण्यासाठी केवळ एक दिवशीय कार्यशाळा पुरेसी नसून,या विषयावरील सविस्तर प्रशिक्षणाची गरज या प्रसंगी अनेक सरपंच व ग्रामसेवकांनी व्यक्त केली. तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सरपंच संतोष ठिकेकर तसेच आपल्या गावाचा रोजगार हमी कामाचा ३.५ कोटी रुपयांचा आराखडा बनविणारे सरपंच खंडू काशीद यांनी त्यांचे अनुभव विषद करताना अशा सविस्तर प्रशिक्षणाची गरज यावेळी बोलून दाखविली.सहभागी झालेल्या ४७ ग्रामपंचायतीं पैकी १८ ग्रामपंचायतिनी या विषावरील सविस्तर प्रशिक्षण वर्गात तातडीने सहभगी होण्यासाठी तयारी दर्शिविली व आपला सहभाग नक्की केला. या एक दिवसीय कार्यशाळेचा प्रतिसाद लक्षात घेता, द नेचर कॉन्झर्वन्सी संस्थेने या विषयावरील प्रत्येकी तीन दिवसीय कालावधीच्या दोन सविस्तर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात त्याचे आयोजन केले जाणार आहे.याबाबत जास्तीच्या माहितीसाठी संस्थेच्या प्रकल्प संचालक गिरिजा गोडबोले यांचेशी किंवा संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी सीताराम शरणांगत यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बुधवंत,मीना नदीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वीणा पाटील,सनियंत्रण अधिकारी ज्ञानेश नानोरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार,शांताबाई वर्वे तसेच शास्वत संस्थेचे कार्यकते हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे शशिकांत आल्हाट यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.