( पर्यटकांना व अभ्यासकांना सुवर्णसंधी)
जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या फोफसंडी येथे कलहीच्या रानातील ओढ्यामध्ये वेगवेगळ्या तोडांच्या आकाराची रांजण खळगे असलेली दुर्लक्षित दुर्मिळ कुंडे आहेत.घनदाट जंगल डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या व मोठ मोठे दगड– धोंडे असलेल्या या रानच्या परिसरात खूप वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक आकर्षक कुंडे रांजण खळगे पाहायला मिळतात ओढ्यातील पात्रात पाषाणांमध्ये नैसर्गिक कुंडे वर्षानुवर्ष वाहणाऱ्या पाण्याच्या आघात घर्षणामुळे रांजण खळगे तयार झाले आहेत. त्यामध्ये कढई कुंड, पाच फुटाच्या चुल्हींच्या आकाराचे चुल्हांगण कुंड,चमच्याच्या आकाराचे चार फुट खोलीचे चमचा कुंड,अर्धवर्तुळाकार पसरट बशीच्या आकारासारखे कपबशी कुंड,कमोड कुंड, रांजण कोथळीच्या आकारासारखे कोथळी कुंड जनावरांच्या पायाच्या मागासारखे पंजाकुंड, बदामी आकाराचे बदामी कुंड, शेकडो दगडींच्या खाली अंधारी भागात असलेले अंधारे कुंड आहे. थोड्या अंतरावर खाली ओढ्यामध्ये उरांड चोहंडीच्या ओघाखाली सुध्दा भिन्न आकाराची छोटी मोठी तीस पस्तीस कुंड आहेत.येथील बाजूच्या भागाला गुन्हाळ, गवताची गंजी गवताचे लवण म्हणतात.
उन्हाळ्यात जंगलातील पशुपक्षी प्राणी तहान भागवण्यासाठी येथे पाणी पिण्यासाठी येतात निसर्गाची खाण,निसर्ग वैभव असलेले ठिकाण फोफसंडी गावापासून ५ते ६किमी अंतरावर आहे. तेथील नैसर्गिक रांजण खळगे पाहण्यासाठी पाय वाटेने चालत जाये लागते.किमान दिड तास वेळ लागतो.आजू बाजूला कारवी,उंबर,जांभळीचे, हिरड्यांचे भरपूर जंगल आहे.रानात प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचे मधुर आवाज ऐकायला येतात.असे हे पर्यटन स्थळ खुप आकर्षित करते.. चोहंडीचे डोह सुध्दा एक प्रकारचे रांजणखळगे आहेत.उंच डोंगर दरी खोप्यातील फोफसंडी हे चोहंडीं कड़े गडद म्हणजे कपारीचे गाव म्हणून सुध्दा ओळखले जाते.या गावातील वयोवृद्ध आदिवासी लोक सांगतात की आमचे वाडवडील व आम्ही देखील याच गडदींमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत साक्ष म्हणून आजही त्या गडदी,गुहा,कपारी येथे अस्तित्वात आहेत निसर्ग रम्य फोफसंडी मधील तसेच अनेक ठिकाणी नदी नाले ओढ्यात भिन्न प्रकारची पाषाणाच्या आकाराची चोहंडी आहेत.चोहंडी म्हणजे विहीरीच्या आकारासारखी मोठ मोठी बाव १२/१३ परस खोल कुंडे रानातील चोहंडी विहीरीच्या आकारा- च्या गोलाकार चपट्या काही अर्ध वर्तुळाकृत खोल– खोल आहेत.
उन्हाळ्यातही त्यामध्ये पाणी असते.फार पूर्वी पासून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे. १९७२ च्या दुष्काळात या कुंड चोहंडीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला इथल्या दगडाचे वैभव आहे वेगळे निराळे खळग्यांची खोली व आकार वेगवेगळे आहेत कातळ खडकात भिन्न आकाराचे तोंड असलेले खोलगट खड्डे पडले आहेत.निळ्या क्षार पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहतात.दगड गोटे व खडक झिजून प्रवाहात ओड्या नाल्यात असे नैसर्गिक भौगोलिक अदभूत चमत्कार पाहायला मिळतात. आजूबाजूला आहे गर्द दाट जंगल झाडी सौंदर्य पाहत जातो,मनसोक्त आनंद लुटता येतो.नाना प्रकारची आहेत.कुंड चोहंडी, रांजण खळगे,भेकार कुंड, बाळकीचे कुंड,बरावटा पाटा चोहंड,गाय चोहंड, घोडंचोहंड,चाटूपाळा,आगाडा,उरांड चोहंड,तेल्याचे कुंडे,भाकरीचे कुंड,चुल्ही कुंड,पान्हवठा गोफना, डरावडा,वाघमारा,आगाडा,तिरिय,नळीचे पाणी, पाखराचे पाणी,कोंबड पाणी इ नैसर्गिक पाणवठे आहेत या ठिकाणी पाण्याचा खळखळाट खळखळता प्रवाह दगडांवर आदळत असतो खळखळता आवाज मनोहारी असतो.
आक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात ते दृश्य डोळ्यांच्या कॅमेऱ्यात साठवण्यासारखे असते पावसाळ्यात हे ओढे खळगे आकर्षक शुभ्र धवल आणि नवल वाटतात ओढ्याच्या पात्रात सतत दगड गोट्यांचे पाषाणांचे घर्षण होते झीज होते.वर्षानुवर्षे हि क्रिया होत आहे.डोंगर झाडीतून दगड धोंडे यातुन पाणी वेगाने वाहत जाऊन खडकाकृती निमार्ण झालेल्या पाण्याचा खळखळ आवाज नाद मधुर येतो. निसर्ग सानिध्यात वेगळीच धून अनुभवायला मिळते.अशा ठिकाणी भटकंती फेरफटका मारताना साहस लागते, शेवाळावरून पाय घसरुन पडण्याची जोखीम असते.. येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी असे अनेक दृश्य टिपण्यासाठी ऐतिहासिक कोंबडकिल्ला म्हणजे कुंजरगड, ब्रिटिश कालीन पोप हाऊस अवशेष,शेकडो धबधबे, मिनी सांदण दरी, आकाराची दरी, डोंगर टेकडया,विविध गुहा,भुयारे, ढोली, गडदी,निसर्ग वैभव, उगवता सुर्योदय,मावळता सुर्यास्त,विविध नैसर्गिक जैव संपदा फोफसंडी येथे जाऊन पाहणे म्हणजेअनुपम आनंद आहे.
शब्दांकन:- कवी यशवंत घोडे,फोफसंडीकरसंकलन:-रविंद्र भोर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा