(भरवस्तीत दिवसा हल्याची पहिलीच घटना.)
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:- जुन्नर येथील पानसरे पटशिवारात शेतकऱ्याच्या राहत्या घरासमोर रिकाम्या बैलगाडीला बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने चक्क भरदिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हल्ला करून दोन्ही शेळ्या ठार केल्याची माहिती शेतकरी, शेळी मालक जालिंदर गजानन पानसरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की,जालिंदर पानसरे यांनी आपल्या घरासमोर रिकाम्या बैलगाडीला दोन शेळ्या बांधल्या होत्या.शुक्रवारी दुपारी एकचा सुमार असल्याने पानसरे परिवारातील सर्वजण घरात असताना बिबट्याने बाहेर बांधलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले.
परिणामी शेतकऱ्याचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले असून दिवसाही बिबटे भर वस्तीत हल्ले करू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.दरम्यान ही माहिती ओतूर वनविभागाला कळविली असता त्यांनी पंचनामा करून शेतकऱ्याचे मागणीनुसार घटनास्थळ परिसरात पिंजरा लावणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले. :–बिबट्याचे दिवसा हल्ले घातकच-:
जुन्नर तालुक्यात इतर भागांच्या तुलनेत विशेषतः ओतूर परिसरात बिबट्यांची संख्या जास्तच आहे.अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना दिवसा व रात्री बिबट्यांच्या दहशतीत वावरावे लागत आहे. शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आलेले असुरक्षित जीवन दिवसेंदिवस घातक बनत चालले असून कुटुंबातील बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.शेतकरी जीव मुठीत धरून शेतात काम करीत आहे.वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना सायंकाळ नंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.आंबेगव्हान ता:- जुन्नर येथील बीबट सफारी प्रस्तावित कामाला अद्यापही चालना मिळालेली नाही. बिबट सफारी काम पूर्णत्वास गेल्यास मानव-बिबट संघर्ष थांबण्यास मोठी मदत मिळून मानव व बिबट दोन्हीही सुरक्षित जीवन व्यतीत करू शकतात. त्यामुळे रखडलेल्या बिबट सफारी प्रकल्प कामास प्राधान्याने चालना देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.