जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय,ओतूर येथे दि.१४जानेवारी २०२४ ते दि. २८ जानेवारी२०२४ “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” विविध स्पर्धा, कार्यक्रम व उपक्रमांनी साजरा करण्यात आला.अशी माहिती प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ करण्यातआली.”मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यानिमित्ताने महाविद्यालयात निबंध लेखन स्पर्धा,कथा अभिवाचन स्पर्धा,घोषवाक्य लेखन स्पर्धा,देशी शब्द संकलन स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, काव्यवाचन, पारिभाषिक संज्ञा संकलन, व्याख्याने, एकांकिका अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता प्रा.प्रल्हाद शिंदे यांच्या विशेष व्याख्यानाने करण्यात आली.”मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर बोलताना ते म्हणाले,” मराठी भाषेचा प्रचार प्रसार, जतन व संवर्धन करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे.मराठी भाषेला वाङ्मयाचा सकस व समृद्ध वारसा लाभलेला आहे.आजच्या पिढीने त्या साहित्यात मौलिक भर टाकावी.त्यातून मराठी भाषेचे वैभव अधिकाधिक समृद्ध होईल.”
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.अवघडे म्हणाले,” विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर गरजेपुरताच करावा.त्याच्या आहारी जास्त जाऊ नये. विद्यार्थी हा ग्रंथालयात रमावा, साहित्याचे विविध प्रकार त्याने वाचावेत. त्यातून त्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वसंत गावडे , सूत्रसंचालन मनोज गायकर व सायली आहिनवे या विद्यार्थ्यांनी केले.आभार डॉ.रोहिणी मदने यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी,डॉ.छाया तांबे,डॉ. नंदकिशोर उगले,डॉ.किशोर काळदंते,डॉ.विनायक कुंडलिक,डॉ.निलेश काळे,डॉ.अनिल लोंढे डॉ.निलेश हांडे यांनी विशेष सहकार्य केले.सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे व डॉ.के.डी. सोनावणे यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धां मध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह-बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे.