जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
आज एका दैनिकामधील बातमी वाचली व बिबट्याची दहशत कायम हा शब्द वाचून दोन शब्द लिहावेसे वाटले कारण ही दहशत कायमच राहणार आहे.असा एकही दिवस जात नाही बिबट्याची बातमी कुठल्या ना कुठल्या दैनिकात येत नाही.तो रोज बदनाम केला जातोय.काळजी घेणे हे आपल्या हातात असते.हे काळजी नावाच्या हत्याराचा वापर ज्याला जमला तो सुरक्षित झालाच म्हणून समजा.एका चर्चा सत्रात मी सहभागी झालो होतो.विशेष म्हणजे चर्चा- सत्रात सहभागी जे झाले होते हे सगळेच वा- यावर अगदी बिबट्याच्या तोंडाशी झोपणारी मंडळी होती. अशी एकही जागा नसेल तेथे ही मंडळीं अडचणींच्या ठिकाणी झोपल्या नसतील.ओढे,उस,नदी, झाडं झुडपे ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे काही दिवसांसाठी संसार थाटणारी ही माणसं म्हणजेच मेंढपाळ होय.
ते म्हणतात असा एकही दिवस जात नाही की आमचा सामना बिबट्याशी होत नाही.कधी कधी तर बिबट्याच्या तोंडातील मेंढी ओढून आम्ही त्या मेंढीला वाचवतो.पहिले लांडगे हल्ला करायचे आता त्या जागी बिबट्या आलाय.आमची जमातच मुळातच संघर्षात जन्माला आलीय.आमचा संघर्ष ज्यांच्याशी आहे ते हिंस्र प्राणी पोटासाठीच संघर्ष करतात व आम्ही पण पोटासाठीच संघर्ष करतोय.आम्ही हा संघर्ष शक्यतो कधीच कुठे मांडण्याचा प्रयत्न करत नाही कारण आमच्या दोघांच्या दुःखाचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे पोट.
मी गेली अनेक वर्षे भटकंती करतोय व यातून अनेकनिरीक्षणे करत आलोय यातून एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की मेंढपाळ हे पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्य स्वर्ग खुलवणारे,झाडं लावणारे निसर्ग प्रेमी आहेत.कदाचित हे त्यांनाही ठाऊक नसावे. बाभळींच्या झाडांची घटती संख्या जर विचारातघेतली तर त्याचे कारण आहे मेंढपाळांची कमी होणारी संख्या मेंढीचे आवडतं खाद्य म्हणजे बाभळीच्या शेंगा. मेंढीने शेंगा खाल्ल्या की तिच्या पोटातुन या बाभळी- च्या बिया अनेक ठिकाणी ती रानात जाईल तिकडे विष्ठेतून प्रसारित होत असत तसेच तिच्या लोकरीला अडकलेल्या बिया प्रसारीत होण्यास मदत होऊन अनेक झाडं झुडपांची नैसर्गिक निर्मिती झालेली पहायला मिळते.आज हे संपत असल्याने पक्षी प्राणी यांचा अधिवास धोक्यात येत आहे. हे शब्द कदाचित काहींना पटणार नाहीत व भविष्यात बिबटे आपल्या घरात येऊन राहिले तर नवल वाटणार नाही. चिंतेच्या म्हणजेच दहशतीच्या मुळापर्यंत जोपर्यंत आपणशिरत नाही तोपर्यंत ही दहशत थांबूच शकत नाही.ही दहशत थांबविण्यासाठी ज्या गोष्टींचे पालन व्हायला हवे ते माणसांकडून होणं शक्यच नाही म्हणून ही दहशत कायमच राहणार आहे.
मेंढपाळ आपल्या उसाच्या कडेला येऊन झोपतोय त्याला भिती नाही का? वा-यावर झोपणारी ही मंडळी किती जणांवर आजपर्यंत हल्ले झालेत?कितीमेंढपाळ या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत? याची उत्तरे शोधली तर एकच गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे त्यांनी स्वतः घेतलेली सुरक्षितता की जी नेहमीच त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते की जी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे.बिबट्या पासून जी दहशत आज जुन्नर ,आंबेगाव,खेड,शिरूर तालुक्यात निर्माण होत आहे याला जबाबदार दुसरं तिसरं कुणीच नाहीतर स्वतःच्या विनाशाचे खड्डे खोदणारा बुध्दीजीवी प्राणी म्हणजे मानवच आहे,की ज्याला वाचाळ जिभेने सहज बोलता येत मात्र कृतीतून दाखवून देण शक्य होत नाही.मानव बिबट संघर्ष कमी करने मानवाच्या हातातच आहे. संघर्ष कमी व्हावा असे वाटत असेल तर पुढील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. हे जर आपण थांबवू शकलो तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना निश्चितच टाळता येऊ शकतात आणि जर आपण हे थांबवू शकत नसेल तर बिबट्याची दहशत भविष्यात उग्र रूप धारण करेल यात शंकाच नाही.
१) बिबट्या पुन्हा जंगलात जाऊन रहायला तयार आहे पण त्या जंगलाला आगी लावायच्या आपण थांबविल्या पाहीजेत.२) जंगलास आग लावून पेटवलेल्या गवतावर तेथील राहणारे प्राणी जगत असतात व ते प्राणी चारा नसल्याने ते शेताकडे पोट भरण्यासाठी मोर्चा वळवतात कारण ते राख खाऊन जगत नाहीत त्यामुळे त्यांचा चारा उपलब्ध होण्यासाठी मदत करा ३) बिबट्याचे अन्न म्हणून जे प्राणी जंगलात राहतात उदा. ससा, रानडुक्कर, कोल्हे, हरण, घोरपड, इ. यांची शिकार करून खाणारे पण आपणच व तेथील चा-यावर पण आपलीच जनावरे चरतात हे थांबविण्याचा प्रयत्न केला की बिबट्या नक्कीच त्यांच्या घरी रहायला जातील.
या तीन गोष्टी जरी आपण स्वार्थी माणसानं पाळल्या तर बिबट्याची दहशत संपायला मदत होईल व रोज विविध दैनिकात प्रकाशित होणारी बिबट्याची दहशत नक्कीच थांबेल. दैनिक प्रकाशित करणारा जर बिबट्या असता तर त्याने पण एक लेख निश्चितच लिहीला असता आम्ही फक्त स्वतःच्या पोटासाठी संघर्ष करतोय परंतु आमच्या घरांवर स्वार्थी मानसाने अतिक्रमण केल्याने त्यांची दहशत कायम आहे.
✍️ रमेश खरमाळे ( माजी सैनिक)संकलन:-रविंद्र भोर:-उपाध्यक्ष:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा.