पिंपळगाव जोगा,डिंगोरे गटातील गावागावांमध्ये होणार आंदोलन.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापूर ता:-जुन्नर येथील बनकरफाटा येथे नगर- कल्याण महामार्गावरील मुख्य चौकात सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला व अन्नत्यागाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.तसेच डिंगोरे, पिंपळगाव जोगा गटातील गावागावांमध्ये साखळी उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील डिंगोरे,उदापूर,पिंपळगाव जोगा,कोळवाडी, पांगरीतर्फे मढ,बल्लाळवाडी,आलमे,नेतवड,माळवाडी ,मांदारणे व परिसरातील इतर गावांतील मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.तसेच यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विविध जातिधर्माच्या नागरिकांनीही पाठिंबा दिला. तसेच मुस्लिम समाजाच्या युवकांनीही पाठिंबा दिला.
यावेळी सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.तसेच “छत्रपती शिवाजी महाराज की जय’,एक मराठा लाख मराठा’,’आता नाही तर कधीच नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ या व इतर घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.उदापुर, डिंगोरे पिंपळगाव जोगा,मांदारणे,नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी,आलमे या गावांत राज्य,केंद्रपातळीवरील राजकीय नेत्यांना माळशेज पट्ट्यातील गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. यावेळी सकल मराठा समाजाकडून उपोषणाला पाठिंबा देणारे निवेदन ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांना देण्यात आले.