जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. प्राचार्य डॉ.अभय खंडागळे,उपप्राचार्य डॉ.व्ही. एम.शिंदे डॉ.व डॉ.कल्याण सोनवणे या मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शंभर विद्यार्थ्यांनी निवडक चरित्र व आत्मचरित्रांचे सामूहिक वाचन केले.वाचनाचे महत्त्व या विषयावरील घोषवाक्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.यानिमित्ता ने डॉ.कलामांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. सदर प्रसंगी प्रास्ताविकात डॉ.निलेश हांडे म्हणाले, “माणसाची जडणघडण होण्यात वाचनाचा वाटा महत्त्वाचा असतो.महान व्यक्तिमत्व ही वाचनानेच घडतात.”डॉ.वसंत गावडे यांचे वाचनाचे महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले.ते म्हणाले, सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यास वाचन संस्कृती महत्त्वाची आहे.आजच्या काळात पालकांनी आपल्या मुलांवर वाचनाचे संस्कार करावेत.
प्राचार्य डॉ.खंडागळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.”आपण रोज काहीतरी नवीन आवडीच्या विषयाचे वाचन करावे.वाचनाची सवय आयुष्यात मोलाची साथ देते.त्यातून आपले जीवन समृद्ध होते.”आभार डॉ.छाया तांबे यांनी मानले.डॉ.सुनील लंगडे,डॉ.रोहिणी मदने,मंजुषा कुलकर्णी,गणेश डुंबरे, निखील काकडे यांनी विशेष सहकार्य केले.