जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर


पुण्यासह महाराष्ट्रातून सुमारे १५००० स्वयंसेवकांचा सहभाग संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी मिशनचा ७६वा वार्षिक निरंकारी संत समागम,गेल्या ७५ वर्षांप्रमाणे याही वर्षी २८,२९,आणि ३० ऑक्टोबर २०२३रोजी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन उपस्थितीत भव्य रूपाने संपन्न होणार आहे.या समागमाचा दैवी आनंद जगभरातून येणारे सर्व निरंकारी भक्त आणि श्रद्धाळू भाविक घेतील.या आनंदाच्या बातमीने संपूर्ण निरंकारी जगतात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक प्रांतातील भक्त ‘वसुधैव कुटुंबकंम’ या सुंदर अनुभूतीसह एकत्वाच्या रूपात सदगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांची दिव्य अमृतवाणी श्रवण करण्याचा आनंद लुटतील. निःसंशयपणे, हे एक अलौकिक दृश्य असेल जिथे सर्व लोक आपली भाषा, जात,धर्म आणि सर्वस्व विसरून जातील आणि ‘एकत्वाच्या’ दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतील.
समागम म्हणजे संतांचा पवित्र संगम,या दैवी सोहळ्याची जय्यत तयारी निरंकारी भक्तांकडून पूर्ण समर्पणाने,निस्वार्थी व निष्काम भावनेने केली जात आहे.जिकडे पाहावे तिकडे हजारो भक्त नि:स्वार्थपणे आपली सेवा करत आहेत. नाचत नाचत,सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते सूर्यास्तापर्यंत सद्गुरुंचे प्रत्यक्ष रूपात दर्शन घेत आहेत. हा अनोखा देखावा पाहता निरंकारी मिशनची शिकवण सौहार्द व एकात्मतेची सुंदर अनुभूती दाखवत असल्याचे दिसते.लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्व भक्तगण या सेवांमध्ये उत्साहाने आणि मनापासून योगदान देत आहेत.एका ठिकाणी मैदाने सपाट करण्यासाठी मातीने भरलेली घमेली तर दुसऱ्या बाजूने रिकामी घमेली घेऊन जाताना भाविक दिसत आहेत.लहान मुलेही चिमुकल्या हातात घमेली धरून सेवेचा आनंद लुटत आहेत.सर्वत्र निस्वार्थ सेवेचा अनोखा नजारा पाहायला मिळत आहे येणार्‍या सर्व श्रद्धाळू,भाविक सज्जनांचे भव्य स्वागत करण्या- साठी हे सर्व केले जात आहे जेणेकरून समागमाचा अद्वैत,परमोच्च,दैवी सुखाचा लाभ प्राप्त करता येईल.
उल्लेखनीय आहे, की पूर्वतयारीसाठी पुण्यासह महाराष्ट्रातून मागील दोन महिन्यांपासून तुकड्या तुकड्यांनी निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण नियमितपणे समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीच्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये पुण्याहून सुमारे १००० तर उर्वरित महाराष्ट्रातून सुमारे १४००० स्वयंसेवकांचा समावेश आहे.
समागमासाठी येणाऱ्या संतांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तंबू उभारण्यासारखी अनेक सेवाकार्य सेवादारांकडून मोठ्या उत्साहाने सुरू आहेत. समागम स्थळावर मुख्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. भक्तगणांच्या अहोरात्र निस्वार्थी सेवेचे सकारात्मक फलित म्हणजे अल्पावधीतच तंबूंनी सजलेले सुंदर शहर एका आकर्षक समागम स्थळात रूपांतरित होणार आहे. मानवतेच्या सेवेत समर्पित झालेल्या सर्व सेवादल आणि भक्तगणांच्या चेहऱ्यावर थकवा नसून आनंदाचा भाव दिसत आहे, जो पाहून अंतःकरण अत्यंत प्रसन्न होते. हे सर्व सदगुरु माताजींच्या पवित्र आशीर्वादानेच संभव होत आहे. सेवेसाठी सदगुरु माताजी अनेकदा त्यांच्या प्रवचनात स्पष्ट करतात की, ‘पवित्र भावनेने तनाद्वारे केलेली सेवा, निस्वार्थीपणे केलेले धनरुपी दान आणि अंतःकरणापासून शुद्ध पवित्र भावनेने केलेली भक्ती हे त्रिवेणी कल्याणाचा संगम होय.’ अर्थातच तन, मन आणि धनाने केलेली सेवा ही नेहमीच श्रेष्ठ मानली जाते, त्यामुळे आपले सर्वत्र कल्याण साधते.
७६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमात संपूर्ण भारत तथा देश विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. निरंकारी सेवादलाचे बंधू आणि भगिनी निळा आणि खाकी गणवेश परिधान करून, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि त्यांना त्यांच्या पूर्वनिश्चित निवासस्थानी नेण्याची व्यवस्था करताना दिसतील.सेवेचे महत्त्व ‘संपूर्ण हरदेव बाणी’ मध्येही सांगितले आहे की, निरिच्छित निष्काम सेवा अमृत के समान है।कहे ‘हरदेव’ गुरू का उसमें छुपा हुआ वरदान है।सहाजिकच, या अलौकिक भव्यदिव्य निरंकारी संत समागमामध्ये, प्रेम, एकता आणि शांतीच्या या पवित्र संगमात स्वतःला सामील करून परम दैवी आनंद अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येक भाविक श्रद्धाळू भक्तगणांना मनःपूर्वक अभिवादन आहे
.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button