जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आळे ता:-जुन्नर येथील तितरमळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांच्या चार वर्षीय शिवांश मुलावर आजोबांच्या देखत हल्ला करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने बुधवार दि:-११ ऑक्टोबर रोजी गजाआड केल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र आधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दि:-९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवांश भुजबळ हा चार वर्षीय मुलगा आपल्या घरातून आजोबांच्या मागे बाहेर अंगणात आला होता त्याच बरोबर गावातून त्यांचे दुसरे आजोबा घरासमोर वाटेने येत होते त्यावेळी शिवांश चॉकलेट मिळेल या आशेने त्यांच्याकडे निघाला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवांशवर झेप घेतली व त्याला मानगुटीला जबड्यात पकडून समोरच्या उसाच्या शेतात घेऊन गेला.
यावेळी अविनाश गडगे या तरुणाने धाडस करून कोयता हातात घेऊन बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याला हुसकावून लावले व मुलाला त्याच्या तावडीतून सोडवले मात्र या हल्ल्यात तो बालक गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना ते बालक मृत झाले.
यावेळी घटनेची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र आधिकारी वैभव काकडे,आळेफाटा पोलीस स्टेशन
चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर यांनी धाव घेतली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली यात सामान्य व्यक्ती पासून
अनेक राजकीय नेत्यांनी वनविभागाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता तर जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्या आशाताई बुचके यांनी हा हल्ला अधिकाऱ्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर झाला असता तर ???
वनविभागाने आपल्या नियमांत व कायद्याच्या कक्षेत बदल घडवून आणले पाहिजे केवळ टोलवाटोलवीची उत्तरे न देता समयसूचकता ठेवून काम करावे असे सुचवले.
परिणामी ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र आधिकारी वैभव काकडे यांनी या घटनेची युद्धपातळीवर कार्यवा ही सुरू करून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या तितर मळ्यातील ऊसाच्या शेतात जवळपास १५ पिंजरे ,१५ ट्रॅप कॅमेरे,ड्रोन कॅमेरा,सर्व वनविभाग कर्मचारी यांना मोहीम लावून दिली आणि बुधवार दिनांक :-11 ऑक्टोबर रोजी पहाटे या नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळविले असून ही मादी बिबट असून पूर्ण वाढ झालेली सात वर्षे वयाची असून वनविभागाने या बिबट मादीला माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.येथे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे व्यवस्थापक महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या नरभक्षक बिबट्याचे निरीक्षण सुरू आहे.
सदर कार्यवाही ही अमोल सातपुते,उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहा.वनसंरक्षक, जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली व्ही. एम.काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर,वनपाल ओतूर सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड ओतूर व रेस्क्यू टिम ओतूर तसेच वाईल्डलाईफ एस ओ एस यांच्या मदतीने करण्यात आली.