जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आळे गावात बिबटयाने एका चार वर्षीय बालकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर त्यावर उपचार चालु असताना तो बालक मृत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आळे ता:- जुन्नर गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा चार वर्षीय मुलगा अंगणात आजोबा निवृत्ती भुजबळ यांच्याबरोबर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खेळत होता. अचानक घरासमोरील ऊसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला करत त्याच्या मानेला पकडुन शेतात नेत असताना याठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले होते.परंतु हल्ल्यात तो बालक गंभीर जखमी झाला व त्याच्यावर आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालु असताना तो बालक मृत झाला आहे.
घटनास्थळी ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांणी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, आळे परीसरात दिवसेंदिवस बिबटयाचे हल्ले वाढतच चालले असुन, दररोज नागरीकांना बिबट्याचे दर्शन होत असुन, पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. नागरीकांना घराबाहेर पडायची भिती वाटली लागली आहे. चारच दिवसांपुर्वी आगरमळा येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता.
यामध्ये थोडक्यात तो वाचला आहे. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंज-यांची संख्या वाढवावी तसेच आळे ग्रामस्थांच्या वतीने आळेफाटा येथील चौकात आंदोलन व रास्ता रोको केला जाईल असा कडक इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके यांणी दिला आहे.