शुभम वाकचौरे
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रशासक अरुण साकोरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर) यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले असून, या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध करत ७ मे रोजी शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शहरात दररोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत भरणाऱ्या शेतकरी बाजाराचा वेळ अचानक पहाटे ४ वाजता करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व शारीरिक संकट ओढवले आहे. शिरूर शहर हे शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतमाल विक्रीसाठी मुख्य केंद्र असून, संध्याकाळची वेळ शेतकरी व ग्राहक दोघांसाठीही सोयीची ठरत होती. मात्र काही मोजक्या धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या:1. शेतकऱ्यांना रात्री घर सोडावे लागते: रात्री चोऱ्यांचा धोका, बिबट्यांचा हल्ला, अपघात यामुळे जीव धोक्यात येतो आहे.2. भाव मिळत नाही: पहाटेच्या वेळेस ग्राहक नसल्याने योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.3. गैरसोयींचा सामना: बाजार समितीच्या आवारात कोणतीही सोय नाही – शेड नाहीत, पावसापासून संरक्षण नाही.4. ग्राहकांशी थेट संपर्क तुटला: व्यापारी अल्पदरात माल खरेदी करून जास्त दराने ग्राहकांना विकत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट सुरू आहे.5. बाजार व्यवस्थापन कोलमडले: बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:1. बाजार वेळ तात्काळ संध्याकाळी ५ ते ८ अशी पूर्ववत करण्यात यावी.2. शेतमाल विक्रीसाठी आवश्यक सोयीसुविधा – शेड, पाणी, प्रकाश, विश्रांती व्यवस्था – उपलब्ध करावी.3. वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी योग्य पार्किंगची सोय करण्यात यावी.4. शिल्लक राहिलेला शेतमाल साठवण्यासाठी कोल्ड स्टोअर्सची व्यवस्था करावी.5. स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी जास्त सुविधा द्याव्यात.6. बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत शेड व ओटे हटवून शेतकऱ्यांना मोकळा आणि सुरक्षित परिसर उपलब्ध करून द्यावा.7. बाजार समितीबाहेरील रस्त्यावर असलेल्या गाळ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी हटवावी.8. बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून स्थानिक शेतमालाला चांगला भाव मिळेल.9. ग्राहकांपर्यंत थेट वाजवी दरात शेतमाल पोहोचण्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ साखळी सक्षम करावी.
आंदोलनाचा इशारा:
वरील मागण्या मान्य न झाल्यास, दि. ७ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच सायंकाळी ५ वाजता शेतकरी बाजार थेट रस्त्यावर भरवण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे.या पार्श्वभूमीवर दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन शिरूर तहसीलदार कार्यालय, सहकार विभाग निबंधक व शिरूर पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.