जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर हद्दीत अमिरघाट शिवारातून अहिनवेवाडी येथे दुचाकीवरून जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याने अचानक हल्ला करून दुचाकीस्वाराच्या मांडीवर पंजा मारल्याने एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.अमोल वसंत ठिकेकर वय ४५, रा:-अमीरघाट,ओतूर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना बुधवारी दि:- ३० रात्री १० वाजण्याच्या सुमारास सारणी फाटा येथे घडली.या घटनेची माहीती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन जखमी अमोल ठिकेकर यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले आहेत. दरम्यान ओतूर व परिसरात बिबट्याची संख्या वाढती असल्याने रात्रीच्या सुमारास वावरताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.