जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील लेण्याद्री गिरिजात्मक गणपती ते हटकेश्वर पर्यंतच्या डोंगर रांगेतील वऱ्हाडया डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका उंच कड्याचा सुळका काल कोसळला असून यातील प्रचंड आकाराचे दगड धोंडे खाली असलेल्या आदिवासी वाड्यावस्त्यां आणि गावच्या दिशेने खाली आले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तीय हानी झाली नाही. हटकेश्वर हा डोंगर अत्यंत महाकाय आणि उत्तुंग स्वरूपात असून इतिहासात नोंद करण्यात आलेला असून या डोंगरावर सुप्रसिद्ध असे शिवलिंग मंदिर असून याच्या पूर्वेला आलमे गावातील खंजीरवाडी असून येथून या गडावर जाणे अवघड मात्र शक्य असणारी वाट आहे तर उत्तर बाजूला घोडेमाळ,कोळवाडी वाटखळ,पांगरी आणि त्यांच्या वाड्यावस्त्या असून यातील कोळवाडी गावच्या शेजारच्या वऱ्हाडी डोंगराचा कडा कोसळला यावेळी लोकवस्तीच्या दिशेने आलेल्या दगडांना झाडाझुडुपांनी अडविल्याने मोठा अनर्थ टळला.यातील काही दगड कड्यावर अडकले असून यातील काही कडे कधीही कोसळू शकतात असे स्थानिक आदिवासी नागरिकांनी सांगितले.
या ठिकाणी खडी क्रेशर मशीन सतत डोंगर पोखरण्याचे काम करीत असल्याने डोंगर आणि घरांना हादऱ्याने भेगा पडल्या आहेत परिणामी धोका वाढला असून या रांगेतील डोंगराचा भाग कधीही कोसळून पडू शकतो असे ग्रामस्थांनी सांगितले.
कोळवाडी भाग हा धरण परिसर व डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात असल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी होत असतो. यावर्षी जोरदार पावसाला सुरुवात झाली असून,या डोंगर परिसरात दोन खडी केशर असल्यामुळे येथे वारंवार जमिनींना हादरे बसत आहेत. गेली दोन-तीन दिवसांपासून थोडी थोडी दरड कोसळणे चालू झाले आहे.काही दरड आलमे गावच्या दिशेने तर काही दरड कोळवाडी गावातील आदिवासी समाजाच्या असलेल्या १५० लोकवस्तीच्या पिरवाडी व इतर आदिवासी पाड्यांच्या दिशेने कोसळली वऱ्हाडया डोंगराचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे स्थानिक आदिवासी जनता भयभीत झाली आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात भेट देऊन पाहणी करून आवश्यक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, तेथे योग्य उपाय योजना करून आदिवासी समाजाला आधार मिळेल.
ईरसाळवाडीसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याकडे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावे. ड्रोनद्वारे पाहणी करून किती भाग अजून कोसळू शकतो याचा सर्वे करून येथील आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत कोळवाडी याबाबत संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असून बिडिओ, तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून देणार आहे. वेळ पडली तर या आदिवासी जनतेचे पुनर्वसन देखील करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू जेणेकरून कुठलीही जीवित हानी होणार नाही याची काळजी घेऊ,असे सरपंच नितीन घोलप यांनी सांगितले.