- प्रतिनिधी जिजाबाई थिटे
- एकत्र बसून खाल्लेले डबे… निकालाच्या दिवसाची भीती…. बोर्डाची परीक्षा…. हातावर खाल्लेल्या छड्या….. मैदानावर खेळलेले खो-खो, कबड्डीचे डाव…. मन भारावून टाकणारा तो शेवटचा दिवस… आणि आता उरल्या त्या गोड गोड आठवणी… अशा विविध चर्चेत तब्बल २१ वर्षांनी पुन्हा आठवणीत रंगले विद्यार्थी.
शैक्षणिक वर्ष २००३-०४ इयत्ता दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा नुकताच भांबर्डे(ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी सर्व २९ विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती मातेच्या पुजनाने करून नयना थोरात, मंगल पवार, दिपाली पवार यांनी स्वागत गीताने सर्व गुरूजनांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटा, श्रीफळ, गुलाब पुष्प व बुके देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी जोडल्या गेलेल्या आठवणींना उजाळा दिला. विठ्ठलरुख्मिणी मंदिरात भरणारी शाळा आणि उत्तम इमारतीत भरणारी शाळा हा प्रवास थक्क करणारा आहे. यासाठी संस्थेचे मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांना गहिवरून आले. त्यानंतर सर्व शिक्षकांचे मनोगते झाली.
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव आणि शाळेचे मुख्याध्यापक मारूती कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे विद्यार्थी आजही शाळेचे नाव मोठे करण्यासाठी धडपड करत आहेत. आजही शाळेतून दिलेले संस्कार जपताना शाळेला अडचणीच्या वेळी मदत करतात. या सर्व बाबींचा विचार करता विद्यालायला सार्थ अभिमान वाटतो आहे.
शाळेला मदत म्हणून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ११,०००/- रुपये देण्यात आले. माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक आबा म्हस्के या विद्यार्थ्यांकडून सर्वांना भोजन देण्यात आले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक मारुती कदम , शिक्षक उत्तम गाडे ,सुरेश शेळके , बाळासाहेब दिवेकर, सविता शिंदे, लेखनिक रोहिदास इंगळे, कर्मचारी नानासो थोरात, लालासो जगताप, विठ्ठल जगदाळे उपस्थित होते.
सुवर्णा पवार,शितल पवार,संध्या वीर,सारिका धुमाळ, प्रमिला गारगोटे,सुवर्णा खेडकर, दिपाली पवार,अलका वीर, ऊषा म्हस्के आदी विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन ईश्वर देशमुख, विजय पवार, संतोष रासकर, अनिल म्हस्के, माऊली शिंदे,जितेंद्र वीर,बापू धरणे, संतोष पेटकर आदिंनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मांढरे यांनी केले तर आभार अमोल शिंदे याने मानले.