जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्यातील पर्यटनास संघटित पर्यटनाद्वारे चालना मिळावी त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक लोकांना जैवविविधतेचे महत्त्व अवगत व्हावे या उद्देशाने किल्ले शिवनेरीचे पायथ्याशी भारतीय वनसेवेचे अधिकारी श्री. अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांच्या संकल्पनेतून व श्री.अमित भिसे, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनात “छत्रपती शिवराय वनउद्यान” उभारण्यात आलेले आहे. सदर उद्यानाचा लोकार्पण सोहळा वनविभाग जुन्नर मार्फत उद्या. दि. ३०/६/२०२४ रोजी शिवराय संकुल येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार श्री.अतुल बेनके व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. उद्यानातील सर्व कामे ही निसर्गानुरूप करण्यात आलेली आहेत. ज्यामाध्यमातून पर्यटकांना इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होईल. किल्ले शिवनेरीचे पायथ्याशी “छत्रपती शिवराय वनउद्यान” येथे फुलांची सजावट, लँडस्केपिंग आणि तेथे हिरवळ लॉन तयार करुन उद्यान तयार करण्यात आलेले आहे. ज्यामुळे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. स्वच्छ हवा, हरियाली, आणि शांत वातावरण असल्याने तेथे वेळ घालवणे पर्यटकांच्या आरोग्यासाठी फायद्याचे होईल. सदर उद्यानांमध्ये विविध वनस्पती आणि वृक्षांचे संगोपन केले आहे. उद्यानांचे जतन आणि व्यवस्थापन हे पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. जुन्नर तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथे मोठया प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. पर्यटकांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे ही पर्यटनाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. निवासस्थान हे पर्यटकांना आराम, सुरक्षितता, आणि आनंददायी अनुभव देतात. त्याअनुषंगाने “छत्रपती शिवराय वनउद्यान” मध्ये असलेल्या 4 निवासस्थानाचे नुतनीकरणाचे काम करण्यात येऊन ते पर्यटकांना निवासाकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रोपवन कामामुळे उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य वाढले आहे. विविध रंगी- बेरंगी फुलं, झाडं आणि वनस्पती पर्यटकांना आकर्षित करतात. सदर रोपवन माध्यमातून विविध प्रकारच्या स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते, ज्यामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मदत होईल. सदर रोपवनामध्ये एकूण विविध फूलझाडांची लागवड करण्यात आलेली असून त्याचे संगोपन करण्यात येत आहे.

शिवाय येथे 50 मी लांबीचा नावीन्यपूर्ण पंचकर्म पाथवे वाळू, लाल माती, मुरुम, हरळी (हरियाली), खडी इत्यादी पाच नैसर्गिक मुल्यांपासून बनविणेत आलेला आहे. सदर पंचकर्म पाथवे पर्यटकांना एक उत्कृष्ट अनुभव देतो तसेच आरोग्य सूदृढ ठेवण्यास मदत करतो . तसेच पंचकर्म पाथवे च्या माध्यमातून पर्यटकांना आपली संस्कृती व पर्यावरणाचे महत्त्व याबददल अधिक जाणीव होईल. पंचकर्म उपचार हे आयुर्वेदातील शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. हे उपचार शारीरिक आणि मानसिक शांतीसाठी उपयुक्त असतात.

“छत्रपती शिवराय वनउद्याना” मध्ये विविध जैवविविधतेचे छायाचित्र हे दगडावर रेखाटण्यात आलेले आहे. या माध्यमातून पर्यटकांना प्राकृतिक सौंदर्याचा अद्वितीय अनुभव मिळेल. तसेच लहान मुलांना रंगी-बेरंगी प्राणी – पक्षी यांच्या छायाचित्रांबाबत एक आत्मियता असल्याने सदर दगडावरील छायाचित्रांव्दारे त्यांचेमध्ये लहानपणीपासूनच निसर्ग व त्याची जोपासना करण्याबाबत जाणीव निर्माण होण्यास मदत होईल. दगडी प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तूंचा एक भाग असतात. सदर प्रवेशद्वारामुळे पर्यटकांना त्या स्थळाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होईल. उद्यानाचे संवर्धन व संगोपनाचे व्यवस्थापन करणेकरिता वनतळे ची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सदर वनतळयाचे माध्यमातून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते.

बाहेरील खुल्या व्यायामशाळा पर्यावरणाशी अधिक सुसंगत असतात. पर्यटकांना नैसर्गिक वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद मिळतो, ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. प्रकरणी जुन्नर शहरातील बहुसंख्य लोक हे पहाटे व सायंकाळी च्या वेळी आरोग्य चांगले रहावे याउददेशाने शिवनेरी परिक्रमा रस्त्याने फेरफटका करीत असतात, या खुल्या व्यायामशाळेमुळे त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुधारणेमध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल.

बांबू पॅगोडा हे स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या अनोख्या रचनात्मक शैलीमुळे ते पर्यटकांना आकर्षित करतात. प्रकरणी उद्यानामध्ये बांबू पॅगोडा उभारण्यात आलेला आहे. सदर बांबूचा वापर करून बनवलेल्या पॅगोडयाचे माध्यमातून पर्यावरणीय जाणीव वाढवण्यास मदत होईल. पर्यटकांना पर्यावरणास अनुकूल वास्तुकलेचे महत्त्व समजेल आणि त्यांना पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळेल.

दगडी पाथवेवर चालण्यामुळे पर्यटकांचे शारीरिक आरोग्य सुधारते. हे पाथवे चालण्यासाठी उत्तम असतात, ज्यामुळे पर्यटकांना ताजेतवाने वाटते आणि त्यांच्या फिटनेसला चालना मिळते.

जैवविविधता माहितीफलक पर्यटनाच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे असून सदर माहितीफलकाव्दारे पर्यटकांना शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि पर्यावरणीय माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. प्रदिप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी सांगितले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button