जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जून महिना संपत आला असताना जुन्नर तालुक्यातील चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या माळशेज घाट आणि परिसरात पावसाची एकदाही दमदार हजेरी लागली नसून आदिवासी शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे कारण जुन्नर तालुका पश्चिम पट्टा तसेच उत्तरेकडील माळशेज घाट माथा ते कोपरे, मांडवे,मुथाळणे,या आदिवासी भागातील शेतकरी भात या मुख्य पिकांवर आपले आर्थिक नियोजन क असतात.यंदा एकही वळीव झाला नाही तसेच मान्सून देखील बरसला नाही, जो थोडा फार पाऊस झाला त्याच्यावरच रोमठे आणि धूळफेक भात पेरणी झाली मात्र आता जून महिना संपत आला असून मोठा पाऊस किंवा भिज पाऊस न झाल्याने रोमठे आणि भातपेरणी वाया जाणार दुबार पेरणी करावी लागणार याची काळजी शेतकरी बांधवांना सतावत आहे.
जुन्नर तालुक्यात परिसरात आठवडाभरापूर्वी तीन ते चार दिवस सातत्याने पावसाने हजेरी लावली होती.मृग नक्षत्र पाऊस झाल्याने आदिवासी शेतकरी शेतीच्या खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीसाठी मोठा फायदा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर पाऊस फक्त या माळशेज पट्ट्यात हेरगिरी करतो की काय अशी शंका शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.दरवर्षी चेरापुंजी प्रमाणे कोसळणारा पाऊस यंदा माळशेज पट्ट्यावर रुसला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात मोठा पूर येवून मांडवी व पुष्पावती घोड्याच्या चालीने वाहणाऱ्या नद्या यंदा प्रथमच कोरड्या पात्राने मिरवताना दिसतात
जणू कायम सौभाग्याचे लेणं घेणारी स्त्री कुंकू न लावता उघड्या कपाळाने मिरवते.सह्याद्रीच्या डोंगरावर पाऊस पडलाच नाही तर झरे,झुरे,ओढे,नाले ,धबधबे सर्व अजून मृत अवस्थेत असून खाचरे आणि पात्र कोरडेठाक पडली आहेत.
या आदिवासी भागात या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मानव व गुराढोरांसाठी अत्यंत बिकट होणार त्याच बरोबर चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर असून आदिवासी पशुपालकांनी चारा छावण्यांची मागणी केली आहे यात कोपरे, मांडवे,मुथाळणे,जांभुळशी,फोफसंडी, पुताचीवडी,जोशीवाडी, माळीवाडी,अगवणे वस्ती, शैलाचा माळ,मारखुलवाडी,या भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा व गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा गँभिर बनला असून लवकरात लवकर शासनाने चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.
तरकारी उत्पादक शेतकरी मात्र आनंदात असून थोडा पाऊस लांबल्याने मनातल्या मनात खुश आहेत कारण माळशेज पट्ट्यातील नदीच्या काठावर असणारे गावात जवळपास ८०% शेतकरी या कालखंडात तरकारी म्हणजे कोबी,फ्लॉवर,धना,तसेच भाजीपाला याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात परिणामी जर मोठा पाऊस अथवा मौसमी पाऊस पडला तर या पिकांना मोठा फटका बसतो याशिवाय काही आदिवासी शेतकरी या ठिकाणी उन्हाळी बाजरी
पीक घेतात मात्र काढणीला बाजरी आल्यानंतर पावसाने नुकसान होते त्यामुळे हे शेतकरी पाऊस येत नाही म्हणून खुश असतात.
एकमात्र नक्की पाऊस गरजेचाच आहे जर तो पडला तर ओढे,नाले,झरे,झुरे,धबधबे आणि नद्या यांना तुडुंब भरून वाहता येईल यांच्यामुळेच तालुक्यातील पाच सहा धरणे भरणार आहेत,ज्या पिण्याचा, चाऱ्याचा आणि शेतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे