प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
फुटाणवाडी ता.शिरूर येथील शेतकरी ह.भ.प.कचरू शिवराम दाभाडे यांची कन्या प्राजक्ताची निवड महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ज्युनिअर असिस्टंटपदी झाली. प्राजक्ता ही गेली दोन वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास गगनभरारी अकॅडमी राजगुरुनगर ता.खेड या ठिकाणी करत होती अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्राजक्ताने हे यश संपादन केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ताने पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुटाणवाडी पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ या ठिकाणी पूर्ण झाले आहे. जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर प्राजक्ताने हे यश मिळवले असल्याचे श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी सांगितले.
गगनभरारी अकॅडमीचे अशोक वंजारी,श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ तसेच श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाबळच्या वतीने प्राजक्ताचा सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य अविनाश क्षीरसागर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.