(भुजबळ यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव’)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘शिवनेरीभूषण पुरस्कार’ हवामान शास्त्रज्ञ अरुण रामचंद्र साबळे व ब्रिगेडिअर अनिल महादेव काकडे यांना तर ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ आयपीएस अधिकारी दिलीप भुजबळ यांना जाहीर झाला आहे.या वर्षीचा शिवनेरीभूषण पुरस्कार दोघांना देण्यात येणार आहे.मानाचे हे दोन पुरस्कार शनिवारी ता. १०) आमदार अतुल बेनके यांनी जाहीर केले.शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
शिवनेर भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणारे अरुण रामचंद्र साबळे हे जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील तळमाचीवाडी येथील रहिवासी असून भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत अंटार्टिका मोहिमेत मैत्री केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली आहे.यापूर्वी ३७ व्या मोहिमेत त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.यावर्षी प्रथमच अंटार्टिका मोहिमेत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्रदूषणाचा अभ्यास करण्यात येत असून मैत्री स्टेशन प्रमुख म्हणून जाणारे साबळे हे जुन्नर तालुक्यातील पहिले व्यक्ती आहेत.
डॉ.दिलीप पाटील भुजबळ हे भारतीय पोलिस सेवेतील २००४ चे अधिकारी असून आळे ता:-जुन्नर येथील भूमिपुत्र आहेत.विशेष पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या पदावर ते कार्यरत आहेत.सामाजिक ऐक्य परिषद,फासे पारधी पुनर्वसन प्रकल्प,गुटखा मुक्त समाज अभियान,महिला समीकरण महिला सबलीकरण,बेटी बचाव बेटी पढाव आदी योजना प्रभावीपणे त्यांनी राबविल्या आहेत. ज्ञानभारती प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका,वसतिगृह,नागरी सेवा प्रशिक्षण आदी सोईसुविधा माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.
ब्रिगेडिअर अनिल काकडे पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील असून सध्या अहमदाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्टेशन कमांडर म्हणून काम करत आहेत.पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे त्यांनी पास केली.नागालँड,मणिपूर, आसाम अरुणाचल प्रदेश तसेच १९९९ मध्ये ऑपरेशन विजय(कारगिल युद्ध) २००२ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेत तीन वेळा जखमी झाले ब्रिगेडिअर काकडे यांना चार शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवेसाठी पाच पुरस्कारमिळाले आहेत.
ही एक अपवादात्मक कामगिरी आहे.त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथे प्रशिक्षक म्हणून काम केले असून बिडी बारी,अहमदाबाद आणि पुणे येथील पब्लिक स्कूलचे अध्यक्ष ही राहिले आहेत.