(रामभाऊशेठ बोरचटे,ज्ञानेश्वर खिलारी साहेब,असिफभाई महालदार,जालिंदरशेठ औटी सन्मानित)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच समर्थ सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला.संस्थेच्या वतीने शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,सहकार,उद्योग अशा अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा उल्लेखनीय व भरीव कामगिरी केल्याबद्दल “समर्थ सन्मान पुरस्कार २०२४” साठी नामांकन करण्यात आले होते.समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने सामान्य परिस्थिती असणाऱ्या परंतु असामान्य कर्तबगारी करणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा “समर्थ सन्मान पुरस्कार २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बेल्हे गावचे ग्रामनेते व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि तब्बल ३५ वर्षे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी राहिलेले रामभाऊ बोरचटे यांना त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,सेवा काळात एक धडाडीचे,पारदर्शकपणे कारभार करणारे,कल्पक व सृजनशील अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले मंगरूळ गावचे ज्ञानेश्वर खिलारी,रिलायन्स फायर प्रोटेक्टिव्ह सिस्टीम मुंबई चे संचालक व इस्रोच्या चांद्रयान मोहीम-३ मध्ये विशेष योगदान देणारे राजुरी गावचे सुपुत्र असिफभाई महालदार,श्री सिद्धिविनायक इंटरप्राईजेस मुंबई या कंपनीच्या माध्यमातून देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण इमारतींना लिफ्ट बसवण्याचे काम ज्यांनी केले आहे ते जालिंदर औटी यांना “समर्थ सन्मान पुरस्कार २०२४” ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
शिरूर लोकसभेचे खासदार व सिने अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते व डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.प्राचार्य जी के औटी यांनी मानपत्र वाचून सर्व पुरस्कार्थींची माहिती उपस्थितांना दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते पण ते देवा पेक्षाही कमी नव्हते.माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोचता येतं याचं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते.त्यांनीस्वतःच्या पराक्रमाने व कर्तृत्वाने स्वराज्याची स्थापना केली होती.ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता.विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या प्रत्येक शिकवणुकीचा अंतर्भाव आपल्या काळजात करणं महत्त्वाचं आहे.हा समर्थ सन्मान पुरस्कार म्हणजे समाजात आदर्श व प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा सन्मान असे
यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,निलेश बोरचटे,लहु गुंजाळ, बाळासाहेब खिलारी,,सुरेश बोरचटे,अकबरभाई पठाण,संजय औटी,जयचंद जुंदरे,रामदास फावडे, सादिक आतार,मुबारक तांबोळी,पांडुरंग औटी,राजू इनामदार,नितीन औटी,चंद्रकांत ढगे,पप्पू पटेल, शकिरभाई चौगुले आदि मान्यवर तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.