जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रामोत्रती मंडळ कृषी विज्ञान केंद्र,नारायणगाव येथे ‘ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२४’चेआयोजन ८ ते ११ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते,तर पीक प्रात्यक्षिकांचे उद्घाटन राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे,अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरचे संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे,जुन्नरचे आमदार अतुल बेनके,खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडेपाटील,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे,संचालक अॅड. संजय काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या ८० एकर प्रक्षेत्रावर एकात्मिक शेतीपद्धतीचे मॉडेल, परसबाग,पोषणबाग, नैसर्गिक शेती पीक प्रात्यक्षिके व निविष्ठा निर्मिती,विविध फळ,फूल व भाजीपाला पिकांचेविविध डेमो प्लॉट्स,चायनीज भाजीपाला पिकातील विविधनावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके,चारापिके,परसबागेतील कोंबडी पालनाच्या विविध जाती,तृणधान्य पिकांची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ड्रोनद्वारे सेंद्रिय निविष्ठा फवारणी पाहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे.यासोबतच – राष्ट्रीय व आंतर– राष्ट्रीय कंपन्यांची विविध दालने, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, कृषीविषयक उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण शेतीतील बाबी, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसाय इत्यादींची पूरक माहिती दिली जाणारआहे. कृषीविषयक परिसवाद, अनुभवी शेतकरी,यशस्वी उद्योजकांची व्याख्याने, महिला मेळावा, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट, या कृषी प्रदर्शनातून होणार आहे.त्याचबरोबर शासकीय व खासगी क्षेत्रातील नामांकित कृषी निविष्ठा,कृषी साहित्य, कृषी अवजारे उत्पादक कंपन्यांची उत्पादने कृषी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
दि:-८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शासनाच्या विविध योजना व शेतकऱ्यांसाठी बँकेच्या विविध योजना, दि:९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान नैसर्गिकसेंद्रिय शेतीचे घटक आणि महत्त्व,आयुर्वेदिक पशु उपचार पद्धती, दुपारी २ वाजता शाश्वत ऊस उत्पादनासाठी हवामान अद्ययावत खोडवा निडवा व्यवस्थापन, दि:- १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मिलेट आहारातील महत्त्व व व्यावसायिक संधी आणि दुपारी २ वाजता शास्त्रोक्त पद्धतीने कांदा आणि टोमॅटो उत्पादनाविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठीच्या अधिक माहितीसाठी प्रा. राहुल घाडगे ९४२२०८००११ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रप्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे. :- धान्य महोत्सवाचे खास आकर्षण-:कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, वेगवेगळ्या सेंद्रिय डाळी, विविध भरडधान्यांची विक्री या ठिकाणी होणार आहे. तसेच महिला बचत गटांमार्फत तयार केलेले लोणचे, पापड, मसाले, कुर्दी पापड्या, मिलेट्सचे पदार्थ आदी गोष्टी आणि खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज उपलब्ध असणार आहे.