जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी गोळेगाव येथे डिसेंट फाउंडेशन पुणे आणि बिजापुरी फ्रेश प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने *विषमुक्त शेती चर्चासत्राचे*आयोजन करण्यात आले होते.
यावेळी फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक कृषी तज्ञ डॉक्टर संतोष सहाने म्हणाले की शाश्वत शेती ही काळाची गरज असून शेतीमध्ये जिवाणूंचा वापर व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे गरजेचे असून त्या आधारित शेतीतील उत्पादन खर्च कमी होणार आहे.विषमुक्त शेतमालाची मागणी जगाबरोबर भारतामधील स्थानिक बाजार– पेठेत सुद्धा वाढत असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विषमुक्त शेतीचे तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे.
जुन्नर तालुका हा पर्यटनामध्ये अग्रेसर आहे.परंतु पर्यटकांसाठी मात्र इथून जाताना सेंद्रिय भाजीपाला व फळे हा एक खरेदीचा पर्याय होऊ शकतो.म्हणून शेतकऱ्यांनी पर्यटकांकडे एक हुकमी ग्राहक म्हणून पहावे.त्याचबरोबर मत्स्यपालन,कुक्कुट पालन व पशुपालन या माध्यमातून सेंद्रिय खताची गरज घरच्या घरी भागवावी.असे मत जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी व्यक्त केले.
मातीच्या आरोग्यावरच शेतीचे भवितव्य आधारित आहे.म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून गांडूळ खत,शेणखत व हिरवळीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे.असे कृषी काव्य गांडूळ खत प्रकल्पाच्या संचालिका काव्या ढोबळे यांनी सांगितले.
कंट्री डिलाईट भारतातील मुख्य शहरांमध्ये भाजीपाला व फळे विपणनाचा व्यवसाय करत आहे. जुन्नर तालुका हा पुणे आणि मुंबई शहरापासून जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्पादित झालेला शेतमाल हा शहारातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंट्री डिलाईट शेतकऱ्यांबरोबर काम करेल व भाजीपाला फळांचे उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान मार्गदर्शनही करेल.असे विजापुरी फ्रेश प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर सचिन लाळे म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस,कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई,मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमित बेनके,फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक कृषितज्ञ डॉक्टर संतोष सहाणे,बिजापुरी फ्रेश प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चे जनरल मॅनेजर सचिन लाळे, कृषी काव्य गांडूळ खत प्रकल्पाच्या संचालिका काव्य ढोबळे, कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे, तसेच महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थित शेतकऱ्यांना जैविक खते व औषधांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कोकणे यांनी केले तर आभार मनीषा काळे यांनी मानले.