जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
आकाश कवेत घेणाऱ्या मुक्त,स्वच्छंदी पाखरांच्या जीवनाचे मानवाला नेहमीच कौतुक वाटत आलेय. अशा या पक्षांना समर्पित पक्षी सप्ताह दिनांक ५ नोव्हें बर ते १२नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो. अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस व पक्षीशास्त्रज्ञ डॉ.सालीम अली यांची जयंती अशादोन्ही दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने तळेरान येथे ओतूर वनविभागाच्या वतीने यावर्षीही पक्षी निरीक्षणाचा उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमामध्ये तळेरान परिसरातील तलावक्षेत्र,माळरान व जंगल परिसरात आढळणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करण्यात आले.यामध्ये तळेरान परिसरात आढळणाऱ्या प्रजातींपैकी ४० ते ५० पक्षांची नोंद या उपक्रमात करण्यात आली.
पक्षी निरीक्षण कार्यक्रमासाठी पक्षी अभ्यासक व जुन्नर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे,पक्षी अभ्यासक सुभाष कुचिक,पक्षीमित्र प्रभाकरभालचिम अमर गायकवाड,विजय वायाळ,रवी हांडे,मंदार अहिनवे हे उपस्थित होते.यावेळी पक्षीअभ्यासकांनी पक्षी निरीक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पक्षांबद्दलची रंजक माहिती दिली.पक्षांच्या हालचाली, त्यांचे भक्ष,त्यांची घरटी ,त्यांचाअधिवास,त्यांचे वेगवेगळे आवाज, पक्षांचा निसर्ग व मानवाशी असलेला सहसंबंध या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजावून दिला गेला.
विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे नोंदी करत परिसरातील पक्षांचे एका वेगळ्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले. व मनात निसर्गाबद्दलचा आदरभाव अजूनच दृढ केला. या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे सुंदर नियोजन अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर वनविभाग, अमित भिसे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर,वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर,यांचे मार्गदर्शनाखाली रवींद्र गवांदे वन परिमंडळ अधिकारी मढ,रामेश्वर फुलवाड वनरक्षक पारगाव तर्फे मढ यांनी केले होते.तसेच या कार्यक्रमामध्ये अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नलावडे, दिवटे, भोगे, येवले, आहेर, पाटे इत्यादी .शिक्षक सहकारी व १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.