जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये उभी फूट पडली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाला उभारी देण्याचे काम करत आहेत.ते राज्य- भरात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी देखील करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.पवार यांनी आज जुन्नर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.इंडिया आघाडीची आगामी बैठक,पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार आणि जुन्नर विधासभेच्या जागेविषयी पवार यांनी माहिती दिली.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी असली तरी जुन्नरची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार आहे,असे स्पष्ट केले.यावेळी त्यांनी तटस्थ भूमिकेत असलेल्या आमदार अतुल बेनके यांनी सूचक इशाराच दिला.शरद पवार म्हणाले,जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.मात्र, जुन्नरमध्ये माझा शब्द डावलला जात नाही.त्यामुळे अतुल बेनके यांना तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी योग्य तो सल्ला दिला आहे.पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहोत.यामध्ये जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाराहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो.