प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
राजगुरुनगर – सलग तिसऱ्या वर्षी पुस्तकमैत्री बुक गॅलरीमध्ये पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. राजगुरुनगरमधील वाचक महिलांनी एकत्र येऊन वाचनाचा संदेश देत ही गुढी उभारली. वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने महिलांच्या हस्ते या वर्षी गुढीची स्थापना करण्यात आली.
म्हणतात, “एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो, पण एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिक्षित होते.” त्याचप्रमाणे, जर महिला वाचनाची गोडी लावून घेत असेल, तर संपूर्ण कुटुंब वाचनसंस्कृती अंगीकारते. या उद्देशाने महिलांनी पुढाकार घेत वाचनप्रेमाचा संदेश देत पुस्तकांची गुढी उभारली.
या उपक्रमाचे आयोजन पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारी यांनी केले होते. कार्यक्रमासाठी राजगुरुनगर येथील नामवंत स्त्रिया उपस्थित होत्या. यामध्ये डॉ. प्रमिला बांबळे, डॉ. शीतल खिसमतराव, डॉ. कुंतल जाधव, प्रा. तृप्ती डावखर, कवयित्री मीनाक्षी पाटोळे, शोभा पानसांडे, अश्विनी वाडेकर, रूपाली पाचारणे, नम्रता थिगळे, रामेश्वरी कडलग, संगीता लोहकरे, अनुजा असवले यांचा समावेश होता.
या अनोख्या पुस्तक गुढी उपक्रमाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी वाचनाचे महत्त्व पटवून देत समाजात वाचनसंस्कृती रुजवण्याचा संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे वाचनाची गोडी वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.