जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुष्पावती नदी हरीचंद्रगडावर उगमस्थान असून पुढे खिरेश्वर,पिंपळगाव-जोगा,डिंगोरे,उदापुर, नेतवड आणि येथेच संगमावर मांडवी नदी जी अकोले तालुक्यातील फोपसंडी गावातील कुंजीर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मांडव्य ऋषींच्या समाधी स्थळयेथून उगमस्थान असून पुढे कोपरे,मांडवे,मुथाळणे, मारकुलवाडी,दर्याबाईचा डोह,चिल्हेवाडी,पाचघर, रोहकडी,ओतूर येथून संगमावर येऊन पुष्पावती व मांडवी नद्यांचा संगम झाला असून पुढे ठिकेकरवाडी येथील ब्रिटिश काळातील सर्वात प्रथम बांधलेल्या धरणात उतरल्यावर पुढे अलीकडेच बांधलेल्या केटी वेअर मधून निसर्गाच्या कृपेने धबधबे रूपाने पुढील पात्रात कोसळताना खूप छान विहंगम नजारा पाहण्यास भर मे महिन्याच्या उन्हाळ्यात मिळत आहे.
जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषीत झाल्यानंतर अनेक पर्यटनस्थळे,किल्ले,गड,माळशेज, दाऱ्याघाट,नाणेघाट,मुथाळणे घाट,अष्टविनायक बाप्पा,अंबा अंबालिक लेणी,भूतलिंगम लेण्या,पाच मोठी व एक छोटे अशी एकूण सहा धरणे आणि त्यांचा परिसर पर्यटनासाठी पर्यटकांची आकर्षण केंद्रे बनली असून आंबेगव्हाण ठिकाणी बिबट सफारी केंद्र सुरू होणार असून ठिकेकरवाडी जवळ असणारे हे निसर्गनिर्मित धबधबे सुध्दा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भर उन्हाळ्यात सज्ज झाले आहेत.
याठिकाणी पुष्पावती नदीचे पात्र अतिशय कठीण खडकापासून व रुंद असल्याने आणिसध्या पुष्पावती व मांडवी या दोन्हीही नदीच्या पात्रात पिंपळगाव-जोगा व चिल्हेवाडी या धरणातून पाणी सोडल्याने प्रचंड असे पाण्याच्या झोतात या ठिकेकरवाडी जवळ खडकाळ पात्रात जल प्रपात निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक या स्थळाला भेट देताना दिसून येत आहेत. ज्यांना या ठिकाणी यायचे असेल त्यांना पुणे ते ओझर व पुढे सात किलोमीटर अंतरावर हे धबधबे,जे पर्यटक मुंबई ते माळशेज घाट मार्गे बनकरफाटा (उदापुर) व पुढे चार किमी नेतवड संगम त्यानंतर एक किमी अंतरावर धबधबे,जे नगर व नाशिक येथून आळेफाटा मार्गे ओतूर व पुढे तीन किमीवर धोलवड मार्गे हे निसर्गाच्या सानिध्यात भर मे महिन्याच्या उन्हाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पोहचू शकतील. रहाण्याची व खाण्याची उत्तम सोय जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत.