जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

ओतूरच्या पूर्व दिशेला असलेल्या मुंजाबा डोंगरावर वणवा लागला की लावला गेला निश्चित माहिती नाही. पण आत्ता वणव्याने उग्र स्वरूप नक्कीच धारण केलेले दिसून येत आहे.त्यामुळे वनव्यांची समस्या वनविभागाला सुटता सुटेना अशी झाली आहे. मुंजाबा डोंगरावर अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत.परंतू वणव्यात त्या नक्कीच जळून खाक होणार यात कुठलीच शंका नाही. तसेच अनेक विविध प्रकारच्या पक्षांचा निवारा आणि अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. सरपटणारे प्राण्यांच्या जीवितास सुध्दा यामुळे धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात वनखात्याने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

:-सह्याद्री पर्वतावर वणवे हे कृत्रिम असून पर्यटनाला मोठा खोडा:-जुन्नर वनविभाग.

यामुळे जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरा- वरील वनांध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागून वनसंपदा त्याचसोबत वन्यजीव नष्ट होत आहे.आगीचा व धुराचा त्रास या परिसरातील वन्यजीवांना आणि मानवालाही होत आहे.मात्र हे वणवे नैसर्गिक नसून कृत्रिम म्हणजेच मानव निर्मित असल्याची माहिती जुन्नर व ओतूर वनविभागाने दिली.जुन्नर वनविभागाने डोंगरावर वणवे लावणाऱ्यांना शोधून कारवाई करावी,अशी मागणी पर्यटन प्रेमी,वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.मात्र वनविभाग सर्वच ठिकाणी पोहचू शकत नाही त्यामुळे ज्या विभागात वणवा लागलेला आहे तेथील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वनसमिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने वणवे आटोक्यात आणता येतील असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.जे लोक स्वार्थीपणा साधण्यासाठी रानात वणवे लावतात त्यांना शोधून काढणे या वन समितीच्या मदतीने शक्य होईल.

डोंगर माथ्यावर तसेच इतर सह्याद्रीच्या डोंगरांवर लागलेल्या आगीत डोंगरावरील जनावरांचा चारा,वाळलेले गवत, झाडे व पशुपक्ष्यांच्या वारसांचा अमूल्य असा ठेवा या वनव्यांनी नष्ट झाला आहे आणि जर वेळेत यावर अंकुश आणला नाही तर सह्याद्रीच्या वनामधील सर्व वनसंपदा एकदिवस संपुष्टात येईल यात तिळमात्र शंका नाही तसेच मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात परिपक्व झालेला रानमेवा या वणव्यामुळे नष्ट होत आहे.तसेच गावरान फळे,फुले, छोटे सरपटणा प्राणी,पशु,पक्षी व इतर वन्यजीवांना या वणव्याच्या आगीत आपला जीव गमवावा लागत असून, काही प्राणी या वणव्याच्या आगीत जखमी होतात.एकूणच डोंगरावर एकदा लागलेल्या वणव्यात कधी ही भरून न निघणारी अशी निसर्गाची मोठी हानी होत आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीकडे मोठ्या प्रमाणात सक्रिय भर देत आहे.तर दरवर्षी लागणाऱ्या वणव्याने वृक्षांची कत्तल होत असताना, वन्यजीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे.त्यामुळे वन्यप्राणी गावात वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे.याशिवाय वनसंपदा नष्ट होत असल्याने बिबट्यांनी मानवी वस्तीतल्या शेतात आश्रय घेतला असून शिकारीच्या उद्देशाने मानवी हल्ले देखील वाढले आहे मात्र याचे कारण वणवा आहे हे सांगूनही कोणालाही पटेल असे वाटत नाही. वनव्यांमुळे वातावरणातील समतोल बिघडून तापमानात वाढ होत असल्याचे जाणवत आहे. या वणव्यामुळे पाणीटंचाईची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे तरी वणवा विरोधी मोहीम वनविभागाने गतिमान करणे गरजेचे आहे,असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

:- वनविभागा बरोबरच स्थानिक ग्रामपंचायत वनसमितीने अलर्ट मोडवर राहण्याची गरज–

-:अलीकडे मानव डोंगरात जंगलात जाऊन वेगवेगळ्या कारणास्तव आनंदाने अथवा दुःखाने पार्ट्यां करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी डोंगरावर,तळी नदीच्या काठावर,रानात,जंगलात दगडाची चूल पेटवून जेवण बनवले जाते. त्यामुळे ही जंगलाला आग लागून शकते तसेच काही नागरिक आपल्या फायद्यासाठी लाकूड फाटा मिळावा,शिकार करतात यावी म्हणून जंगलाला आग लावतात. या शिवाय काही समज गैरसमज यामुळे देखील वणवे लावले जातात.त्यामुळे वनविभागासह स्थानिक ग्रामपंचायत वनसमितीने अलर्ट मोडवर राहणे गरजेचे आहे. दरवर्षीच सतत होणाऱ्या वणव्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट होऊ लागली आहे.त्यामुळे वनविभागाने वणवा लावणाऱ्यांवर धडक कारवाई करावी अशी मागणी पर्यटक, वन्यजीव प्राणी मित्र संघटना व वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button