प्रतिनिधी: मारुती पळसकर
पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी (ता. शिरूर ) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सलग ५ तास अखंड वाचन हा उपक्रम राबवण्यात आला.पहिली ते आठवीपर्यंतचे ५४० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी झाले होते.शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
युवा साहित्यिक बेंडभर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी निश्चित मदत होणार आहे.इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावरील लॉनवर बैठक मारत वाचनाचा आनंद घेतला.अवांतर वाचनाची वेगवेगळी पुस्तके यावेळी विद्यार्थ्यांनी वाचली.यात थोर महापुरुषांच्या जीवनावरील चरित्र, विज्ञान कथा, पंचतंत्र, इसापनीतीच्या गोष्टी यांसारख्या पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले. शालेय जिवनात विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनही करावे.वाचनाने माणूस समृद्ध होतो.ज्ञानात भर पडण्यास मदत होते.वाचन हीच यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.इतिहासातील थोर महापुरुषांनी वाचनातूनच आपले जीवन घडवले.त्यामुळे विद्यार्थ्यांनीही त्यांचे अनुकरण करावे आणि दररोज २ ते ३ तास अवांतर वाचन करावे,असे मत साहित्यिक शिक्षक बेंडभर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच वाचना संबंधी असे वेगवेगळे उपक्रम शाळांमधून दर महिन्याला राबवणे गरजेचे असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी यावेळी व्यक्त केले.