जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्याच्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून ३ लाख ६८ हजार २१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल आहे. आशिष ढवळू भले (वय २३, रा:-डिंगोरे, ता:-जुन्नर),किशोर सुरेश काळे (वय २१, रा:-भोजदरी, ता:-संगमनेर,जि:-अहमदनगर आणि शिवाजी पोपट कातवरे (वय २१,रा:-जांबुत,ता:- संगमनेर,जि:-अहमदनगर)असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरणाऱ्या तरुणांची नावे आहेत.
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.त्यानुसार बुधवारी दि:-२५ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत,पोलिस हवालदार दिपक साबळे,पोलिस नाईक संदीप वारे,पोलिस जवान अक्षय नवले,निलेश सुपेकर हे पेट्रोलिंग करत असतांना त्यांना आशिष भले हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह मोटरसायकलची विक्री करण्यासाठी रोहकडी ता:- जुन्नर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावत वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी ओतूर,रांजणगाव,आळंदी तसेच अहमदनगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.त्यांचेकडून सहा दुचाकींसह ३ लाख ६८ हजार २१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या तिघांवर जुन्नर तालुक्यातील ओतूर, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, संगमनेर तालुक्यातील लोणी व अकोले येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.