जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि जुन्नर तालुक्याच्या अंतिम सीमेवर असणारे व निसर्गाचे अदभुत चमत्कार दाखविणारे याशिवाय गडदिचे (कपारी)गाव म्हणून प्रसिद्ध असणारे अतिदुर्गम आदिवासी गाव म्हणजे इतिहासात ज्याचा उल्लेख असणाऱ्या फोपसंडी गावातील गेली दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवार दि:-१७ मे रोजी पहिला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा टॅंकर पाणी घेऊन पोहचला.अशी माहिती याच आदिवासी गावचे तरुण तडफदार उपसरपंच संजय घोडे यांनी दिली
फोपसंडी हे गाव अनेक गोष्टींमुळे आज प्रकाश झोतात आले असून या गावाला पूर्वीपासून एक ऐतिहासिक वारसा लाभला असून या गावात हरीचंद्रगडाचे व कुंजीर गड म्हणजेच कोंबडकिल्ला यांचा भक्कम तटबंदी लाभलेली असून मांडव्य ऋषींचा मांडवी नदीच्या रूपाने आशीर्वाद मिळालेला असताना येथे निसर्गाने भरभरून दान दिले आहे.आजपर्यंत या गावाला कधीही पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली नव्हती मात्र यंदाचा उन्हाळ्याची तीव्रता इतकी भयंकर होती की फोपसंडी गावच्या प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. याचे एक कारण म्हणजे सध्या येथे मांडवी नदीवर भर उन्हाळ्यात केटी बंधारे बांधकाम सुरू असून या बांधकाम करण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले गेले असा येथील नागरिकांचा आरोप आहे आणि ठेकेदाराला हे पाणी पिण्यासाठी असून ते बांधकाम करण्यासाठी वापरू नको असे ग्रामस्थांनी सांगितले तरीही ठेकेदाराने न ऐकता मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम करण्यासाठी वापरल्याने फोपसंडी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. याचदरम्यान ग्रामसेवक संजय दुसिंग यांनी सरपंच सुरेश वळे यांना विचारात घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पिण्याच्या पाण्यासाठी लागणारा टँकरची मागणी करणे आवश्यक होते मात्र ते ठराव न करता केवळ तोंडी बोलून वेळ काढुपणा केल्याने ही बिकट परिस्थिती फोपसंडी ग्रामस्थांवर ओढवली असा आरोप गावकरी करताना दिसत आहे. याचवेळी बुधा वळे,भिवा वळे,ढवळाबाई वळे,अनुसया वळे,पोपट वळे,तसेच घोडेवाडी,पिचडवाडी, भगतवाडी,मुठेवाडी व गावठाण वस्ती या सर्व ग्रामस्थांनी दोन महिन्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची कमतरता तक्रार दिलेली असताना केवळ ठेकेदाराशी असणारे आर्थिक लागेबांधे यामुळे ग्रामसेवक व ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी या आदिवासी जनतेला अपेक्षा आहे.
या कठीण प्रसंगी उपसरपंच संजय घोडे यांनी अकोले पंचायत समिती अधिकाऱ्यांशी आणि पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर यांच्याशी चर्चा केली या वेळी ग्रामपंचायत सदस्य दगडू भगत,व इतर महिला सदस्यांनी सहकार्य केल्याने शुक्रवारी दि:-१७ मे रोजी पहिला पिण्याच्या पाण्याचा टॅंकर जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील मुथाळणे गावातील असून मांदारणे गावातून भरून पोहचला व घोडेवाडीतील नागरिकांना व नंतर सर्व गावठाण आणि वाडीवस्तीतील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले.