जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आळेफाटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.यापूर्वी त्यांनी स्मारकाबाबत घोषणा केली होती.
‘शिवाजी महाराजांचे सुवर्णस्मारक उभारण्यात येणार आहे.त्यामध्ये सुवर्णसिंहासनावर आरूढ शिवरायांचा पुतळा,त्या स्मारकामागे शिवरायांचा १०० फुटी; तसेच १८० टन वजनी ब्राँझचा पुतळा आणि त्यामागे ८० मीटर उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे,’ असे सोनवणे यांनी जाहीर केले.या पुतळ्याचा खर्च आठ ते १० कोटी रुपये येणार असून, लोकसहभागातून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे,’असेही सोनवणे यांनी नमूद केले.’शिवनेरीपासून सहा कि.मी.अंतरावरील गोद्रे गावी २५ एकर जागा या स्मारकासाठी खरेदी करण्यात आली आहे. ‘ श्रीमंतयोगी सुवर्णस्मारक ट्रस्ट’ ही विश्वस्त संस्था यासाठी निर्माण करण्यात आली आहे.या ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहील.त्याचे केवळ नेतृत्व करीत असलो, तरी ट्रस्टमध्ये अठरा पगड जातीच्या अनेकांना विश्वस्त म्हणून सामावून घेत आहे.प्रकल्प उभारणीनंतर त्याचे लोकार्पण करून तो सामान्य शिवभक्तांसाठी खुला केला जाईल असे आश्वासन सोनवणे यांनी दिले.
शिवरायांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे सूतोवाच आमदार सोनवणे यांनी केले होते.त्याला जोडूनच सुवर्णमंदिर स्मारक प्रकल्पाची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पाच्या अंतर्गत स्मारकाच्या भोवती तटबंदी,भव्य प्रवेशद्वार,शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथालय आणि संग्रहालय,लेझर वॉटर शोसाठी अॅम्फी थिएटर, चित्रपट-लघुपट प्रक्षेपित करण्यासाठी हॉल अशी उभारणी करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी नमूद केले.
“”जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आळेफाटा येथे उभारण्यात येणार आहे.त्यामध्ये हृदयरोग,कर्करोग, किडनीचे आजार,डायलिसिस असे महागडे उपचार अल्प दरांत करण्यात येणार आहेत.त्यासाठी आवश्यक जागा,वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची उपलब्धता करण्यात येणार आहे””-:शरद सोनवणे:- माजी आमदार,जुन्नर:-