जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही गरिबांचा फ्रीज असलेला माठ बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं गरिबांचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना बाजारात मागणीही तेवढीच वाढली आहे.यामुळं माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचं चित्र सध्या जुन्नर तालुक्यातील स्थानिक व ओतूर,मढ या मुख्य बाजारात पाहायला मिळत आहे.
–:मातीसह भुशाच्या किंमतीत वाढ–:
जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामीण गावात म्हणजे मढ,डिंगोरे, ओतूर,आळे,बेल्हा,नारायणगाव व जुन्नरशहरात कुंभार वाडे असून ऋतुमानानुसार तसेच सर्व सणासुदीनुसार हे कुंभार बांधव गणपती उत्सवात गणपती बाप्पा, नवरात्र उत्सवात देवीच्या मूर्ती बनवतात तर उन्हाळ्यात हे बांधव गरिबांचा फ्रीज म्हणून परिचित असलेले माठ,मडके,रांजण तयार करून मोठा व्यवसाय करतात.
या उन्हाळ्यात या व्यावसायिकांनी वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते.यंदाच्या वर्षी मार्च महिन्याचा सुरुवातीलाच उन्हाचे चटके मोठ्या जाणवू लागल्यानं मातीच्या माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.तसंच माठ बनवण्या साठी लागणाऱ्या मातीसह भुशाच्या किंमतीतही यंदा वाढ झाली आहे त्यामुळे मंडक्यांच्या,माठांच्या किमतीत वाढ झालेली आहेच.
:– वेगवेगळ्या प्रकारच्या माठांना पसंती–: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात प्रामुख्यानं काळे माठ बनविले जातात. मात्र,ग्राहक राजस्थान, गुजरातमधील लाल आणि नक्षी असलेल्या माठांनाही पसंती देत असल्यानं पारंपरिक माठांसह विविध प्रकारचे माठही बाजारात बघायला मिळत आहे. माठातील पाणी हे आयुर्वेदिक मानले गेले आहे कारण फ्रीज मधील पाणी सर्दी पडस्याला निमंत्रण देते मात्र माठातील पाणी फिल्टर पेक्षा अधिक गुणकारी मानले जाते.
:–माठातील पाण्यानंच तहान भागते–: यासंदर्भात माठ व्यावसायिक सोनवणे यांच्याशी संवाद साधण्यात आला असता ते म्हणाले की, “कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर लोक मातीच्या माठातील गारगार पाणी पिण्याला पसंती देतात. माठातील पाणी आरोग्यासाठीही चांगलं असते. मात्र,सध्या जारच्या पाण्याला काही नागरिक पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय. जारचं पाणी आता वाडी वस्तीवर,शहरात घर पोहोच मिळतंय.जारच्या पाण्याचा काही प्रमाणात फटका माठ विक्रीत्यांना बसलाय.मात्र,तुम्ही फ्रीज किंवा जारचं पाणी कितीही पिलं तरी तुमची तहान भागणार नाही. शेवटी माठातील गारगार पाणी पिल्यानंच तहान भागते.”