जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
जुन्नर नगरपालिका हद्दीतील सांडपाणी आणि मलमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी गेले अनेक वर्षापासून कुकडी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे प्रशासक यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचप्रमाणे निवेदनाद्वारे नगरपालिका हद्दीतील सांडपाणी त्याचप्रमाणे मलमिश्रित दुर्गंध युक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीपात्रात सोडावे अशी विनंती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अंबादास हांडे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन थोरवे यांनी प्रशासनाकडे केली होती.
अनेक दिवसापासून वेळोवेळी पत्रव्यवहार आणि फोन द्वारे प्रत्यक्ष भेटून देखील चर्चा करण्यात आली परंतु याची प्रशासनाने कुठलीही गंभीर दखल घेतली नाही आणि आत्ता शिरोली बुद्रुक गावानजीक असलेल्या बंधाऱ्या त पाणीसाठा असताना त्यावर जलपर्णीचा विळखा त्याचप्रमाणे पाण्यावर हिरवा तवंग साचल्याचे दिसून येत आहे हेच पाणी शेतीला वापरले जात असून त्याचप्रमाणे या नदीपात्रातील पाणी गोळेगाव हापुस बाग शिरोली खुर्द शिरोली बुद्रुक तेजेवाडी या गावातील नागरिकांना पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते त्या पाण्याच्या काही विहिरी या नदी पात्रात तर काही विहिरी अगदी लगतच असल्यामुळे हे दुर्गंध युक्त पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात अनेक नागरिकांना कॅन्सर सारख्या रोगाचा देखील सामना करावा लागत असून यावर नगरपालिकेने वेळेत योग्य तो निर्णय न घेतल्यास किमान दहा हजार नागरिकांना भविष्यात मोठ्या साथीच्या आजारांसह कॅन्सर सारख्या रोगाचा सामना करावा लागणार आहे. याची नगरपालिकेने वेळेत दखल घ्यावी अन्यथा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचबरोबर परिसरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधी यांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे यांनी दिला आहे.